अभिनेता गोविंदासोबत (Govinda) काल दुर्घटना घडली. पहाटे पावणे पाच वाजता कोलकत्याला जायच्या तयारित असतानाच गोविंदाच्या हातातून त्याची परवाना असलेली रिव्हॉल्व्हर खाली पडली. रिव्हॉल्वरचं लॉक खुलं राहिल्याने चुकून गोळी सुटली आणि ती त्याच्या पायाला लागली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गोळी काढण्यात आली असून आता तो सुखरुप आहे. गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट करत अपडेट शेअर केली आहे.
गोविंदाला काल रुग्णालयात दाखल केल्यानंतर कृ्ष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शाह भेटीसाठी आली होती. कृष्णा परदेशात शूटवर असल्याने तो येऊ शकला नाही. मात्र तो फोनवरुन कुटुंबियांच्या संपर्कात होता. कृष्णाने काल रात्री इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले, "मामाची तब्येत आता बरी आहे. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि प्रार्थनेसाठी आभार. तो लवकर बरा होवो. देव त्याच्यासोबत आहे. तुम्ही प्रार्थना करत राहा."
कृष्णा अभिषेक हा गोविंदाचा भाचा आहे. मात्र मामा-भाच्यामध्ये अनेक वर्षांपासून कौटुंबिक वाद होते. त्यांच्यात फारसं बोलणंही होत नाही. मामा-भाच्याची जोडी कोणत्याच शोमध्येही सोबत दिसली नाही. काही दिवसांपूर्वी भाची आरती सिंहच्या लग्नात मात्र गोविंदा आवर्जुन पोहोचला होता. त्यामुळे कृष्णा आणि गोविंदा यांच्या नात्यात सुधारणा होत असल्याची चर्चा झाली. संकटाच्या प्रसंगी भाचा मामासाठी धावून आला. कृष्णाची पत्नीही तातडीने रुग्णालयात पोहोचली.