करण जोहरच्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर, शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन यांच्याबरोबरच लक्ष वेधून घेतलं ते मराठमोळ्या क्षिती जोगने. या चित्रपटात तिने पूनम रंधावा ही भूमिका साकारली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ चित्रपटातील क्षितीच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही करण्यात आलं. यानिमित्ताने तिने लोकमतशी साधलेला खास संवाद. या मुलाखतीत क्षितीने चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे किस्से आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभवही सांगितला.
‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’साठी पहिला कॉल आला तेव्हा काय भावना होत्या?
पहिला फोन मला चित्रपटाच्या ऑडिशनसाठी आला होता. मी ऑडिशन दिली पण, ही भूमिका साकारण्याची संधी मिळेल याबाबत मला खात्री नव्हती. पण, भूमिका छान होती. ऑडिशननंतर लगेच दोन दिवसांनी मी करण सरांना भेटायलाही गेले होते. इतकं सगळं पटकन झालं. शूटिंगला जाईपर्यंत मला खात्री वाट नव्हती. पण, त्या भावना खूप छान होत्या.
या चित्रपटाची स्टार कास्ट तगडी आहे. आलिया, रणवीरबरोबरच शबाना आझमी, जया बच्चन आणि धर्मेंद्र सर असे दिग्गज कलाकार आहेत. या सगळ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
मी लहानपणापासून जया बच्चन आणि धर्मेंद्र सरांचे चित्रपट पाहत आले आहे. शबाना मॅमची मी खूप मोठी चाहती आहे. त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे, यातच खूप आनंद होता. रणवीर एक खूप चांगला अभिनेता आहे. त्याच्याबरोबर चित्रपटात बरेच सीन्सही आहेत. आलियाही एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यांच्याबरोबर काम करताना खूप छान वाटलं.
‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला तुझ्या लक्षात राहिलेला एखादा किस्सा.
'रॉकी और रानी की प्रेमकहानी' चित्रपटात एक सीन आहे. या फ्रेममध्ये रणवीर, आलिया, जया बच्चन, धर्मेंद सर, शबाना मॅम आणि मी असे सगळेच होतो. या सीनमध्ये शबाना मॅम आणि धर्मेंद्रजींवर फोकस होता. पण, त्यांच्याबरोबर आपण एका फ्रेममध्ये आहोत, या गोष्टीमुळे मला खूप भारी वाटत होतं. हे खूप मोठे कलाकार आहेत. माझ्या जन्माच्या आधीपासून ते काम करत आहेत. त्यांच्याबरोबर आपण एका फ्रेममध्ये आहोत, याने मी भारावून गेले होते. हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही.
करण जोहरच्या चित्रपटात काम मिळालं समजल्यानंतर हेमंतची काय रिएक्शन होती?
हेमंत खूपच खूश होता. माझी ऑडिशन त्यानेच शूट केली होती. ऑडिशन पाठवल्यानंतरच हेमंत मला “तुला हे काम मिळणार”, असं म्हणाला होता. माझ्या भूमिकेबद्दल मी त्याला सांगितलं होतं. या चित्रपटासाठी माझी निवड होईल यावर माझ्यापेक्षा त्याचाच जास्त विश्वास होता.
मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये अजूनही दुय्यम भूमिका मिळतात, असं वाटतं का?
दुय्यम भूमिका कशाला म्हणतात, हेच मला कळलेलं नाही. ज्या भूमिकेचं चित्रपटात महत्त्व आहे, त्या भूमिकेला दुय्यम म्हणता येणार नाही. सई ताम्हणकरने मिमी चित्रपटात साकारलेली भूमिका दुय्यम नव्हती. अतुल कुलकर्णी रंग दे बसंतीमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत होते. भूमिका दुय्यम आहे हे कोण ठरवतं? हिंदी चित्रपटात हिरो-हिरोईनच्या भूमिकेत मराठी कलाकार दिसत नाहीत. पण, मराठी प्रेक्षकांना चांगला कन्टेंट पाहायला आवडतं. रितेश देशमुख हे नाव हिंदी आणि मराठीत दोन्ही ठिकाणी आहे. अमृता खानविलकर राझीसारख्या चित्रपटात दिसली होती. रोहिणी हट्टांगडी, स्मिता पाटील, अशोकमामा, सचिन पिळगावकर, सचिन खेडेकर या सगळ्यांनी हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. द काश्मीर फाइल्स चित्रपटातील चिन्मय मांडलेकरने साकारलेल्या भूमिकेला दुय्यम म्हणू शकत नाही. हम आपके है कौनमधून लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका काढून टाकली तर तो सिनेमा तसा होणार नाही. त्यामुळे दुय्यम भूमिका म्हणजे काय, हे मला कधीच कळलं नाही आणि ते पटलंही नाही.
पूनम रंधावा असो किंवा ‘झिम्मा’मधील मीता या भूमिकेतून महिलांना एक संदेश दिला आहे. सध्या ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपटही खूप गाजतो आहे. यानिमित्ताने काय सांगाल?
आपण आपलं महत्त्व ठरवायचं असतं. इतर आपलं महत्त्व ठरवत नाहीत. आपण कसं जगायचं, हे आपणच ठरवायचं असतं. ‘बाईपण भारी देवा’ किंवा ‘झिम्मा’मध्ये एक बाई दुसऱ्या बाईला सपोर्ट करते, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.