मराठी कलाकार जेव्हा हिंदीत काम करतात तेव्हा खूप चर्चा होते. सध्या अनेक मराठी कलाकार बॉलिवूडमध्येही आपला डंका गाजवत आहेत. छोट्या भूमिकांपर्यंत मर्यादित न राहता महत्वपूर्ण भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. अमृता सुभाष, प्रिया बापट, सई ताम्हणकर ही त्यातलीच काही नावं. यामध्ये आता अभिनेत्री आणि निर्माती क्षिती जोगचीही (Kshiti Jog) चर्चा आहे. करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात क्षितीची सुद्धा भूमिका आहे.
आलिया भट आणि रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका असलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. सिनेमात जया बच्चन (Jaya Bachchan), धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आजमी (Shabana Azmi) ही दिग्गज मंडळी सुद्धा आहे. यांच्यासोबत मराठीमोळी क्षिती जोग स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे त्यामुळे मराठी प्रेक्षकांनाही तिचं कौतुक वाटतंय. जया बच्चन तर अतिशय कडक शिस्तीच्या वाटतात. त्यामुळे या दिग्गजांसोबत काम करताना क्षितीचा काय अनुभव होता हे तिने मटाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. ती म्हणाली,'जया बच्चन यांच्यासोबत काम करताना थोडंसं दडपण होतं. पण शबाना आजमी आणि जया बच्चन सेटवर मिळून मिसळून राहायच्या. सगळे छान आपापसात गप्पा मारायचे. धरमजी तर त्यांनी स्वत: लिहिलेले शेर ऐकवायचे. ज्यांना लहानपणापासून पाहत मोठे झालो त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव वेगळाच आहे.'
ती पुढे म्हणाली, 'इतके मोठे कलाकार असूनही ते सीन करण्याच्या आधी चर्चा करतात. सराव करतात. हा सीन असा करुया की वेगळ्या पद्धतीने केला तर चांगला वाटेल. ते कुठेच आपल्या प्रसिद्धीचा आव आणत नाहीत. रणवीर आणि आलियाही अगदी साधे आहेत. तसंच करण जोहर तर अतिशय प्रेमळ आणि शिस्तबद्ध आहे. सेटवर तर अगदी मजामस्तीचं वातावरण असायचं.'
क्षितीला हिंदीत काम करण्याचा अनुभव आहेच. 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'नव्या' यासारख्या काही हिंदी मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. तर आता थेट करण जोहरच्याच सिनेमात एंट्री घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. क्षिती आणि हेमंत ढोमे सध्या 'झिम्मा २' च्या कामातही व्यस्त आहेत.