९०च्या दशकातील सर्वात लोकप्रिय गायक कुमार सानू (Kumar Sanu ) यांना 1990 साली आलेल्या 'आशिकी' चित्रपटाने स्टार सिंगर बनवलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आशिकी, साजन, दिवाना, बाजीगर, 1942: अ लव्ह स्टोरी यांसारख्या अनेक चित्रपटांमधील कुमार सानू यांच्या गाण्यांनी चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं. त्यांची सगळीच गाणी लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. याच कुमार सानूंबद्दलचा एक किस्सा कदाचित तुम्हाला ठाऊक नसावा. खुद्द सानूदांनी कपिल शर्माच्या शोमध्ये हा प्रसंग सांगितला होता.
तर किस्सा आहे पाटण्यातला. 'आशिकी' या चित्रपटानंतर कुमार सानू लोकप्रियतेच्या शिखरावर होते. याच कुमार सानूंना पाटण्यात एका लाईव्ह शोसाठी बोलवण्यात आलं होतं. सानूदा पाटण्यात पोहोचले. लाईव्ह शो सुरू झाला. पण पुढे असं काही घडलं की, त्याची सानूदांनी कल्पनाही केली नव्हती.लाईव्ह शो सुरू झाला. कुमार सानू यांनी एकापाठोपाठ एक गाणी गायला सुरूवात केली. लोक त्यांची गाणी ऐकून बेभान झालेत. अचानक कुमार सानूंचं लक्ष समोरच्या रांगेत बसलेल्या लोकांकडे गेलं. बघतात काय तर काही माणसं अगदी स्टेजच्या समोर एके ४७ घेऊन बसली होती. नंतर त्यांनी गाणं आवडल्यावर हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली.
टेंटने बनवलेल्या स्टेजवर आधीच ६ ७ भोकं पडली होती. कुमार सानू हे दृश्य पाहून घाबरले. अशात त्यांनी मैं दुनिया भुला दुंगा हे गाणं गायलं. हे गाणं संपतांच त्यांनी लगेच दुसरं गाणं गायला घेतलं आणि बंदूकधारी बिथरले. मैं दुनिया भुला दुंगा कुणी बंद केलं, असं त्यांनी धमकावत विचारलं. इतकंच नाही तर तुला पुन्हा मैं दुनिया भुला दुंगा हे गाणं गायला लागेल, असं जणू फर्मानच साेडलं. असं एकदा नाही तर १६ वेळा घडलं. म्हणजे, दरवेळी कुमार सानूंनी नवं गाणं गायला घेतलं की, बंदूकधारी उठून उभे व्हायचे आणि कुमार सानू यांना पुन्हा मैं दुनिया भुला दुंगा हेच गाणं गायला लागायचं. बंदुकीचा धाक दाखवून ते गाणं त्यांनी सानूदांकडून तब्बल १६ वेळा गाऊन घेतलं. पहाटे ५ पर्यंत हवेत गोळीबार चालला. अखेर सानू कसेबसे आपला तिथून निसटले.