जान कुमार सानू 'बिग बॉस'च्या भलेही फार काही करू शकला नाही. पण शोमधून बाहेर आल्यावर तो त्याच्या पर्सनल रिलेशनमुळे चर्चेत आहे. जान कुमार सानूने शोमधून बाहेर येताच वडील कुमार सानू यांच्यावर निशाणा साधला होता. जान म्हणाला होता की, त्याच्या वडिलांना त्याच्या संगोपनावर प्रश्न उपस्थित केला. पण याचा त्यांना अधिकार नाही. याचं कारण सांगताना तो म्हणाला की, एक वडील म्हणून त्यांनी माझी कधी जबाबदारी स्वीकारली नाही. आता यावर कुमार सानू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुमार सानू यांना मुलाच्या या वक्तव्याचं फार वाईट वाटलं आहे. ते म्हणाले की, आशिकी बंगला ते महेश भट्ट यांना भेटवण्यापर्यंत मी जानसाठी खूप काही केलं आहे.
'बॉलिवूड लाइफ'सोबत बोलताना कुमार सानू म्हणाले की, 'सर्वातआधी तर सर्वांनी तो व्हिडीओ बघावा. मी त्यात संगोपन असा शब्दही वापरलेला नाही. मी केवळ हे म्हणालो की, नालायक गोष्टी करू नये. नालायक गोष्टी, मी त्याला नालायक म्हणालो नाही. दुसरी बाब म्हणजे महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आणि महाराष्ट्राचा सन्मान करावा लागेल आणि हे त्याला शिकवलं पाहिजे. मी हेच म्हणालो होतो. आता तो म्हणतोय की त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी काहीच केलं नाही तर मला याचं वाईट वाटलं आहे'. ('बिग बॉस'मधून बाहेर येताच कुमार सानूवर भडकला मुलगा जान, म्हणाला - संगोपनावर त्यांनी बोलू नये...)
'जानच्या आईने जे मागितलं ते सगळं दिलं'
कुमार सानू पुढे म्हणाले की, 'जर तो हे म्हणत असेल की, कुमार सानू नाव देण्याशिवाय मी काही केलं नसेल तर, तेव्हा फार लहान होता आणि त्याला काहीच माहीत नाही. पण जेव्हा २००१ मध्ये आमचा घटस्फोट झाला तेव्हा त्याच्या आईला जे काही हवं होतं ते सगळं मी दिलं होतं. रीटा भट्टाचार्यने कोर्टात ज्या मागण्या केल्या होत्या, मग तो आशिकी बंगला असो मी त्यांना दिला. सोबतच माझा मुलगा मला भेटत होता. पण आता बिग बॉसनंतर मी त्याला भेटणार नाही. त्याची इच्छा असली तरी नाही'.
'जान म्हणाला बाबा शोमध्ये घ्या, मी घेतलं'
कुमार सानू म्हणाले की, ते कधीच जानने कधीच बिग बॉसमध्ये जावं या मताचे नव्हते. ते शोमध्ये एन्ट्री घेण्याआधी जानला भेटले होते. पण हा शो जानला पसंत होता. त्याला त्यात जायचं होतं. कुमार सानू पुढे म्हणाले की, 'त्याने मला विनंती केली होती की, बाबा मला शोमध्ये घ्या. मी त्याला घेतलं. म्युझिक डायरेक्टर, प्रोड्युसरसोबत भेटवून दिलं. महेश भट्ट रमेश तौरानी आणि अनेकांची भेट करून दिली'.
'काही केलं नसेल तर तो मोठा कसा झाला?'
कुमार सानू सांगतात की, आता लोक त्याला काम देतील किंवा नाही देतील ही त्यांची मर्जी आहे. हे जानचं स्वत:चं टॅलेंट असेल. याबाबत मला काही बोलायचं नाही. ते म्हणाले की, 'आता तुम्ही सांगा की काय नावाशिवाय मी त्याला काही दिलं नाही का? आज तो इतका मोठा झाला आहे, कसा झाला? तो फार लहान होता. त्याच्या घरात कुणी कमावणारंही नव्हतं. त्यामुळे मी जेव्हा हे ऐकतो तेव्हा मला वाईट वाटतं'.
'या गोष्टी मला पुन्हा वाचायच्या नाहीत'
कुमार सानू इतक्यावरच थांबले नाही तर ते म्हणाले की, 'मी दुसऱ्या लग्नानंतर आपल्या परिवारासोबत २० वर्षांपासून शांतीने राहत होतो. आता या सगळ्यात मला पुन्हा पडायचं नाही. जर त्याला खरंच असं वाटतं की, मी काहीच केलं नाही तर आता मी सगळंकाही सार्वजनिकपणे सांगितलं आहे. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. घटस्फोटाच्या कागदांवरही सगळं आहे'.
'त्याला आशीर्वाद त्याने मोठा गायक व्हावं'
अखेर कुमार सानूने मुलाला सांगितले की, 'मी लोकांना भेटण्यासाठी त्याची मदत केली. त्याला शोमध्ये घेतलं. असं असूनही तो हे म्हणत असेल की, मी काहीच केलं नाही तर एक पिता म्हणून त्याने मला प्रेम करू नये. पण मला नेहमीच इच्छा असेल की त्याने मोठा गायक व्हावं. माझा आशीर्वाद त्याच्यासोबत आहे. त्याने माझ्याबाबत कितीही वाईट बोलावं. मी जे बोलायचं ते सगळं बोललो आहे. आता मी थकलोय'.