Join us

प्रसिद्ध दिग्दर्शक कुमार साहनी काळाच्या पडद्याआड, ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 10:24 AM

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमांचे दिग्दर्शक कुमार साहनी यांचं निधन झालंय (Kumar Shahani)

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक कुमार साहनी यांचे निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'माया दर्पण', 'तरंग', 'ख्याल गाथा' आणि 'कसबा' यांसारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी त्यांना ओळखले जायचे. दिग्दर्शनासोबतच कुमार यांनी लेखक आणि शिक्षक म्हणूनही आपला ठसा उमटवला. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

7 डिसेंबर 1940 रोजी लारकाना येथे जन्मलेले कुमार नंतर कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाले. पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमधून त्यांनी चित्रपट विषयक शिक्षण पूर्ण केलं. पुढे कुमार फ्रान्सला गेले. त्यांनी रॉबर्ट ब्रेसन यांच्या Une femme douce या चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. निर्मल वर्मा यांच्या कथेवर आधारित कुमार साहनी यांच्या 'माया दर्पण' या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. कुमार यांनी 'तरंग', 'ख्याल गाथा', 'कसबा' आणि 'चार अध्याय' यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

 कुमार साहनी यांनी 1989 मध्ये 'ख्याल गाथा' आणि 1991 मध्ये 'भावनाथरण' यांची निर्मिती केली. 1997 मध्ये कुमार साहनी यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या 'चार अध्याय' या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवला. ओडिसी नृत्यांगना नंदिनी घोषाल या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. कुमार यांच्या निधनाने एक दिग्गज दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

टॅग्स :बॉलिवूड