हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यात नुकतेच दुसरे शाही स्नान पार पडले. या शाही स्नानासाठी अनेक आखाड्यांतील साधू-संत आले होते. यावेळी कोरोना नियमांच्या पार चिंधड्या उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेक साधूही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मोठी गर्दी असल्याने अनेक ठिकाणी कोरोना नियमांचेही उल्लंघन होताना दिसून आले. येथे ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत आहे, ना कुणी मास्क लावताना दिसत आहे. कुंभेळ्यातील ही गर्दी पाहून दिग्दर्शक राम गोपाल वर्माचा संताप अनावर झाला असून त्याने एक ट्वीट केले आहे.
राम गोपाल वर्माने ट्विटर अकाऊंटवर कुंभमेळ्यातील अफाट गर्दीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘तुम्ही पाहात असलेला कुंभमेळा नाही तर कोरोना अॅटम बॉम्ब आहे… मला आश्चर्य वाटते की या व्हायरल एक्सप्लोजरचा दोष कोणाला द्यायचा’ असे ट्वीट केले आहे.
रामगोपाल वर्माचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून ही गर्दी पाहाता अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अशाप्रकारे गर्दी करणे चुकीचे असल्याचे लोक सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत तर काहींनी त्याचे हे मत चुकीचे असल्याचे सांगितले आहे. तो हिंदूच्या विरोधात असल्याचे काहींनी ट्वीट केले आहे.