बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. होय, त्यांच्या कुटुंबात एका गोंडस बाळाचा जन्म झालाये. अमिताभ यांच्या जावयाने खुद्द ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. आम्ही बोलतोय ते अमिताभ यांचा जावई आणि अभिनेता कुणाल कपूर (Kunal Kapoor) याच्याबद्दल. कुणाल बाबा झाला आहे. (Kunal Kapoor And Wife Naina Bachchan Blessed With Baby Boy After 8 Years Of Marriage)
कुणाल कपूरची पत्नी नैनाने (Naina Bachchan) नुकताच एका मुलाला जन्म दिला. कुणालने सोशल मीडियावर ही न्यूज शेअर केली. कुणाल बाबा होणार, हे आत्तापर्यंत कुणालाही ठाऊक नव्हतं. पत्नी नैनाच्या प्रेग्नंसीची बातमी त्याने जगापासून लपवून ठेवली होती. थेट बाळाच्या जन्माचीच बातमी त्याने शेअर केली. लग्नाच्या आठ वर्षानंतर कुणालच्या घरी पाळणा हलला आहे.
अभिनेता कुणाल कपूर पहिल्यांदा तब्बूचा हिरो म्हणून पडद्यावर झळकला होता. चित्रपटाचे नाव होते, ‘मीनाक्षी- अ टेल आॅफ थ्री सिटीज’. पण कुणालला खरी ओळख दिली ती ‘रंग दे बसंती’ या सिनेमाने. यानंतर लागा चुनरी में दाग, डिअर जिंदगी, आजा नचले अशा अनेक हिट सिनेमांत तो दिसला. कुणाल हा अमिताभ बच्चन यांचा जावई आहे.
अमिताभ बच्चन यांचे धाकटे बंधू अजिताभ बच्चन यांची मुलगी नैनासोबत त्याचे लग्न झालेय. नैनाला बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. तिचे प्रयत्न सुरू असतानाच कुणालसोबत तिची मैत्री झाली आणि पुढे ही मैत्री प्रेमात बदलली. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर कुणाल व नैना विवाहबंधनात अडकले होते. या लग्नाला अमिताभ कुटुंबासह हजर होते. 2015 साली कुणाल व नैनाचे लग्न झाले होते. पण तेव्हा या लग्नाबद्दल फार कमी लोकांना ठाऊक होते. कारण कुणालला आपल्या लग्नाचा गवगवा नको होता.