बॉलिवूडमध्ये सध्या नेपोटिझमच्या मुद्यावरून मोठा वाद पेटला आहे. एवढेच नाही तर या वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार त्यांना मिळालेल्या सापत्न वागणुकीबद्दल बोलू लागेल आहेत. आता अभिनेता विद्युत जामवाल आणि कुणाल खेमू या दोघांनी बॉलिवूडची पोलखोल करत ट्विट केले आहे.काल 29 जूनला डिज्नी प्लस हॉटस्टारने एक व्हर्च्युअल इव्हेंट घेतला. या इव्हेंटमध्ये सात सिनेमे आपल्या ओटीटीवर रिलीज करण्याची घोषणा डिज्नी प्लस हॉटस्टारने केली.
या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, आलिया भट, वरूण धवन अशा कलाकारांना सामील करण्यात आले. कारण डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणा-या सिनेमांच्या यादीत या सर्वांचे सिनेमे होते. मात्र विद्युत जामवाल व कुणाल खेमू यांचे सिनेमे या यादीत असूनही त्यांना या इव्हेंटपासून दूर ठेवले गेले. विद्युत व कुणालने याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या चाहत्यांनाही याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हॉटस्टारच्या या इव्हेंटमध्ये कुणाल खेमूचा ‘लूटकेस’ आणि विद्युत जामवालचा ‘खुदा हाफिज’ हे दोन सिनेमे ओटीटीवर रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली. पण या दोन्ही सिनेमांत मुख्य भूमिका साकारणा-या कुणाल व विद्युतला इव्हेंटसाठी निमंत्रित केले गेले नाही़.
विद्युत जामवालने ट्विटमध्ये लिहिले...
‘एक खूप मोठी घोषणा होती, मान्य आहे. सात चित्रपट रिलीजसाठी तयार आहे. पण कदाचित यापैकी 5 चित्रपट प्रतिनिधित्व करण्याच्या लायकीचे होते. अन्य दोन चित्रपटांना ना कुठले निमंत्रण मिळाले, ना कुठली ओळख. अद्यापही खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. चक्र सुरुच राहणार आहे,’ अशा शब्दांत विद्युतने याबद्दलची नाराजी बोलून दाखवली.
कुणाल खेमूने लिहिले...
‘आदर आणि प्रेम मागितले जात नाही तर कमावले जाते. कोणी आदर, प्रेम देत नसेल तर त्याने आम्ही लहान ठरत नाही. फक्त खेळायला मैदान बरोबरीत द्या. आम्हीही उंच उडी घेऊ शकतो, ’ असे कुणाल खेमूने लिहिले.