Join us  

"मी बहिणीच्या लग्नात हजर होतो", सोनाक्षीच्या लग्नात भाऊ नसल्याच्या चर्चांना अखेर कुश सिन्हाकडून पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 9:24 AM

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सोनाक्षीच्या लग्नातील फोटो किंवा व्हिडिओमध्ये लव्ह आणि कुश दिसले नाहीत. त्यामुळे बहिणीच्या लग्नात सख्खे भाऊ खरंच गैरहजर होते का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता अखेर या चर्चांना सोनाक्षीचा भाऊ कुश सिन्हाने पूर्णविराम दिला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी रविवारी(२३ जून) लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि जहीरने रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरचं वेडिंग रिसेप्शन मुंबईत पार पडलं. त्यांच्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले होते. सोनाक्षीच्या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. मात्र, तिचे सख्खे जुळे भाऊ लव आणि कुश लग्नात दिसले नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 

सोनाक्षीच्या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांनी हजेरी लावली होती. लेकीच्या लग्नात आईवडील भावुक झालेले पाहायला मिळाले. पण, या सगळ्यात सोनाक्षीचे भाऊ मात्र दिसले नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो किंवा व्हिडिओमध्ये लव्ह आणि कुश दिसले नाहीत. त्यामुळे बहिणीच्या लग्नात सख्खे भाऊ खरंच गैरहजर होते का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता अखेर या चर्चांना सोनाक्षीचा भाऊ कुश सिन्हाने पूर्णविराम दिला आहे.

कुश सिन्हाने न्यूज १८ शी संवाद साधला. तो म्हणाला, "आमच्याबद्दल चुकीची माहिती पसरविण्यात आली आहे. एका पोर्टलच्या आर्टिकलवरुन याची सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये कोणत्या तरी सोर्सचा उल्लेख केला होता. मला माहीत नाही हे सगळं कोण करतंय. पण, मी लग्नात हजर होतो. माझे लग्नातले फोटोदेखील आहेत. मी लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो. पण, याचा अर्थ मी लग्नात नव्हतो असा होत नाही. मी लग्नात हजर होतो. आणि माझ्या बहिणीसाठी माझ्या शुभेच्छा नेहमीच राहतील". 

लव सिन्हानेदेखील याबाबत हिंदुस्तान टाइम्सला प्रतिक्रिया दिली होती. "कृपया मला एक-दोन दिवसांचा वेळ द्या. जर मला वाटलं की मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेन तर खरंच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. विचारल्याबद्दल धन्यवाद", असं तो म्हणाला होता.   

टॅग्स :सोनाक्षी सिन्हासेलिब्रेटी वेडिंग