Kusha Kapila : कुशा कपिला ही एक नावाजलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कॉमेडियनही आहे. कुशाने अभिनयाकडं मोर्चा वळवला असून शिल्पा शेट्टी स्टारर 'सुखी' आणि भूमी पेडणेकर स्टारर 'थँक यू फॉर कमिंग'मधून चाहत्यांच्या भेटीस आली. आता ती वैयक्तिक आयुष्यावरुन चर्चेत आलेली आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर घेतलेल्या घटस्फोटावर कुशाने एका मुलाखतीत भाष्य केलं.
कुशा आणि जोरावर सिंह अहलुवालिया यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं होतं. पण, हा घटस्फोट जाहीर करण्याची इच्छा कुशा आणि जोरावर यांची नव्हती. त्यांना काही काळ खाजगी वेळ हवा होता. पण, दोघांच्या घटस्फोटाची बातमी एका न्यूज पब्लिकेशनच्या हाती लागली होती. तेव्हा संबंधित न्यूज पब्लिकेशनने कुशा आणि जोरावर यांना त्यांचा घटस्फोट लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी दोन दिवस दिले होते. ही माहिती 'मोमेंट ऑफ सायलेन्स' या पॉडकास्टमध्ये बोलताना कुशाने सांगितली.
कुशा म्हणाली, "घटस्फोटाची बाब खाजगी ठेवण्याचा प्रयत्न होता. पण वेगळे होत असल्याची बातमी लीक झाली. त्यामुळे न्यूज पब्लिकेशनने एकप्रकारे आम्हाला अल्टिमेटमच दिला होता की, एकतर घटस्फोट झाल्याचे स्वीकारा किंवा तसे काही नसल्यास स्पष्ट नकार द्या. यासाठी आम्ही तुम्हाला दोन दिवस देत आहोत आणि तिसऱ्या दिवशी आम्ही बातमी पब्लिश करू. त्यामुळे घटस्फोटाची माहिती इतर कोणाच्या माध्यमातून नाही तर आमच्याकडून लोकांना लोकांना मिळावी इच्छा होती". या एका मुलाखतीत कुशाने स्पष्ट केलेले की, "संबंधित न्यूज पब्लिकेशन फक्त त्यांचे काम करत होते".
कुशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कुशा 'सुखी' आणि 'थँक्यू फॉर कमिंग'शिवाय अक्षय कुमारच्या 'सेल्फी' आणि रितेश देशमुखच्या 'प्लॅन ए प्लॅन बी' या सिनेमात झळकली आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘मसाबा मसाबा’ या वेब सीरिजमध्ये तिने काम केले आहे. इतकंच नव्हे तर करण जोहरच्या 'घोस्ट स्टोरीज'मध्येही तिने छोटीशी भूमिका साकारली होती. शिवाय, काही कार्यक्रमही तिने होस्ट केले आहेत.