Join us  

Laal Singh Chaddha : अरे देवा! ‘लाल सिंग चड्ढा’ला प्रेक्षक मिळेनात; तब्बल 1300 शो रद्द!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 6:08 PM

Laal Singh Chaddha : ‘भुल भुलैय्या 2’चा अपवाद सोडला तर कोणताच बॉलिवूड सिनेमा कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा येणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र...

गेल्या काही महिन्यात आलेले बॉलिवूडचे बहुतांश सर्वच सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडाधड आपटलेत. ‘भुल भुलैय्या 2’चा अपवाद सोडला तर कोणताच बॉलिवूड सिनेमा कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha ) हा सिनेमा येणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या होत्या. आमिरच्या या बहुप्रतिक्षीत सिनेमाची दीर्घकाळापासून चर्चा होती. अखेर काल रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज झाला. खरं तर रिलीजआधी #BoycottLalSinghchaddha सोशल मीडियावर ट्रेंड झाला होता. सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत असताना हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत आमिरने प्रचंड मेहनत घेतली. दणक्यात प्रमोशन केलं. मात्र शेवटी ज्याची भीती होती, तेच घडलं.

पहिल्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईनं सर्वांची निराशा केली. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे, पहिल्याच दिवशी या सिनेमाचे तब्बल 1300 शो रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. अगदी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar ) रक्षाबंधन (Raksha bandhan) या सिनेमाबद्दलही हेच घडलं.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, अक्षय व आमिरचे दोन्ही सिनेमे देशातील सुमारे 10 हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आले होते. पण काही ठिकाणी चित्रपट पाहायला केवळ 10 ते 12 लोक आलेत. अशात चित्रपटगृहांच्या मालकांनी प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी आणत, दोन्ही चित्रपटांचे शो कमी करण्याचा निर्णय घेतला. चर्चा खरी मानाल तर आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’चे सुमारे 1300 शो कमी करण्यात आले आहेत तर अक्षयच्या ‘रक्षाबंधन’ या सिनेमाचे जवळपास 1000 शो कमी केले गेले आहेत. दुसऱ्या दिवशी लाल सिंह चड्ढाच्या सकाळच्या शोसाठी केवळ ८.२७ टक्के आसने आरक्षित करण्यात आली होत. तर ‘रक्षाबंधन’ची ऑक्युपेन्सी त्याहीपेक्षा कमी 7.63 टक्के होती.

रिपोर्टनुसार ‘लाल सिंग चड्ढा’च्या काही शोसाठी तुरळक गर्दी दिसून आली. दरम्यान सध्या आमिर खानच्या या सिनेमामुळे वातावरण पेटल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर अनेक ठिकाणी सिनेमावर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं जात आहे तर कोल्हापुरात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केल्याचं सुद्धा समोर आलं आहे.

टॅग्स :लाल सिंग चड्ढाआमिर खानअक्षय कुमार