Join us  

'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 5:39 PM

'लापता लेडीज'मध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या रवी किशनची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच प्रतिक्रिया समोर आलीय (laapataa ladies)

आज सर्व भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली. ती म्हणजे 'लापता लेडीज' या सिनेमाची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री झाली. भारतातर्फे मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी 'लापता लेडीज'ची निवड करण्यात आली. किरण राव दिग्दर्शित हा सिनेमा लोकांच्या पसंतीस उतरलाच. शिवाय आता जगात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर २०२५ मध्ये नामांकन मिळाल्याने सिनेमाची संपूर्ण टीम खूश झाली आहे. अशातच सिनेमात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत भाव खाऊन गेलेला अभिनेते रवी किशनने त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

लापता लेडीजची ऑस्कर एन्ट्री होताच रवी किशन भावुक 

आज सकाळी 'लापता लेडीज' सिनेमाची ऑस्कर एन्ट्री झाल्याची बातमी वेगाने पसरली. यानंतर सिनेमातील सर्व कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर येत असतानाच सिनेमात श्याम मनोहर या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारे अभिनेते रवी किशन यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्यात. रवी म्हणाले, "मला खूप आनंद झालाय. मला खरंतर विश्वास बसत नाहीय. माझ्या ३४ वर्षांच्या फिल्मी करियरमध्ये लापता लेडीज हा माझा पहिला सिनेमा आहे जो ऑस्करमध्ये एन्ट्री घेतोय."

रवी किशन पुढे म्हणाले, "मी आमिर खान आणि सिनेमाची दिग्दर्शक किरण रावचे आभार मानतो. आमच्या टीमच्या अथक मेहनतीचं हे फळ आहे. हा सिनेमा आता भारताचं प्रतिनिधित्व करतोय. याशिवाय भारतातील ८०% ग्रामीण भाग कशाप्रकारे प्रगती करतोय हे संपूर्ण जग बघेल.  मुलींना स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो, याचं वास्तववादी चित्रण या सिनेमात दिसतं. सिनेमाच्या  या गोष्टीने मला खूप प्रभावित केलंय." अशाप्रकारे रवी किशन यांनी त्यांचा आनंद व्यक्त केलाय.  भारताचं प्रतिनिधित्व करणारा 'लापता लेडीज' ऑस्करच्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

टॅग्स :आमिर खानरवी किशनकिरण राव