सेलिब्रिटींचे क्रेझी फॅन्सच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. अगदी आपल्या आवडत्या स्टारचा पाठलाग करण्यापासून तर त्यांच्या घरात घुसखोरी करण्यापर्यंत, संपूर्ण सिनेमागृह बुक करण्यापर्यंतच्या अनेक कथा आहेत. आज आम्ही अशाच एका क्रेजी चाहत्याची कहाणी सांगणार आहोत. हा चाहता मेरठचा राहणारा आहे. गौरव शर्मा त्याचे नाव. गौरव शर्मा हे लता मंगेशकर यांचे ‘जबरा’ फॅन आहेत. लता मंगेशकर यांच्यावरील प्रेमाखातर त्यांनी अद्यापही लग्न केलेले नाही. लता मंगेशकर यांच्या फोटोंसोबत ते एकटे राहतात.
36 वर्षीय गौरव शर्मा यांच्याकडे लता मंगेशकर यांच्यावर लिहिलेले प्रत्येक पुस्तक आहे. भारतीय लेखकांचीच नाही तर पाकिस्तानी, आॅस्ट्रेलियन लेखकांनी लता मंगेशकर यांच्यावर लिहिलेली सगळी पुस्तके त्यांच्या संग्रही आहेत. लता मंगेशकर यांनी गायलेले प्रत्येक गाणे त्यांच्या संग्रही आहे. गौरव यांनी विविध शाळांमध्ये लता मंगेशकर यांच्या नावावर 6 उद्याने उभारली आहेत. लता मंगेशकर यांचा हा चाहता इतका कट्टर आहे की, त्याने आजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या आयुष्यात लता मंगेशकरशिवाय अन्य कुठल्याही महिलेला स्थान नाही, असे ते सांगतात.
गौरव उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागात नोकरीला आहेत. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी लता मंगेशकर यांचे गाणे ऐकले आणि त्याचक्षणी अख्खे आयुष्य लता यांच्या नावे करण्याचा निर्णय घेतला.गौरव यांच्या घरात ठिकठिकाणी लता मंगेशकर यांच्या तसबीरी आहेत. लता मंगेशकर यांची प्रत्येक आठवण अगदी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यात आली आहे. गौरव पहिल्यांदा लता मंगेशकर यांना भेटले तेव्हा 10 मिनिटे नुसते रडत होते. लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांना 4 तास घालवण्याची संधी मिळाली होती.