Join us

लता मंगेशकर कायम पांढरी साडी का नेसायच्या ? कारण ऐकून तुम्हीही व्हाल अचंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 5:55 PM

Lata mangeshkar: एका मुलाखतीमध्ये लता मंगेशकर यांनी पांढरी साडी नेसण्यामागचं कारण सांगितलं होतं.

आपल्या सुमधूर आवाजाने संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध करणारी दिवंगत गायिका म्हणजे लता मंगेशकर (lata mangeshkar).  गानसम्राज्ञी असा लौकिक मिळवणाऱ्या लता मंगेशकर यांचं निधन होऊन बराच काळ झाला. मात्र, त्यांची आणि त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. त्यामुळे वरचेवर त्यांची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या साधेपणाची चर्चा होत आहे. जगभरात लता दीदींनी नावलौकिक मिळवला. मात्र, कायम त्यांचा साधेपणा जपत राहिल्या. आयुष्यभर लतादीदींनी कायम पांढऱ्या रंगाच्याच साडीला प्राधान्य दिलं. म्हणूनच त्या पांढरी साडीच का नेसायच्या या मागचं कारण समोर आलं आहे.

लतादीदींकडे अमाप संपत्ती होती त्यामुळे त्या कधीही कपडे, दागदागिने वा अन्य मौजेच्या गोष्टींवर पैसे खर्च करु शकल्या असत्या. परंतु, त्यांनी कधीच वायफळ खर्च केला नाही. किंवा, कधीही थाटमाट केला नाही. त्यांनी कायम पांढऱ्या रंगाच्या सुती साड्यांनाच पसंती दिली.  परंतु, पांढरी साडी नेसण्यामागे एक खास कारण होतं. लता मंगेशकर यांनीच एका मुलाखतीमध्ये त्यामागचं कारण सांगितलं होतं.

"मी लहान असताना सुद्धा पांढऱ्या रंगाचेच परकर पोलकं जास्त घालायचे. मला इतरही रंग आवडतात. परंतु, पांढऱ्या रंगात मी जास्त रमते. मी ज्यावेळी रंगीत साड्या नेसायचे त्यावेळी असं काही घडायचं जे मला न आवडणारं असायचं. त्यातही गडद रंग अंगावर आले की तो रंग माझ्यावर उधळ्यासारखं वाटायचं. मी रंगीत साड्या नेसायला सुरुवात केली होती. पोपटी, गुलाबी अशा साड्या नेसायचे मी. पण, माझ्या लक्षात आलं की, आज हा रंग आवडतो, उद्या तो त्यामुळे याला काहीच अंत नाहीये. त्यापेक्षा पांढरा रंग जवळचा वाटला. तेव्हापासून मी पांढऱ्या रंगाचीच साडी नेसायला सुरुवात केली", असं लता मंगेशकर यांनी म्हटलं होतं.

पुढे त्यांनी पांढऱ्या रंगाच्या साडीवरुन एक किस्साही सांगितला. "मला अनेकदा पांढऱ्या रंगाच्या साडीवरुन टोचून बोललं गेलं होतं असं त्यांनी सांगितलं होतं. संगीत दिग्दर्शक जीएम दुर्रानी यांनी एकदा माझ्या साडीची खिल्ली उडवली होती. एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी मी स्टुडिओत गेले होते त्यावेळी, 'लता, तू रंगीबेरंगी कपडे का घालत नाहीस? तू अशी कशी पांढरी चादर गुंडाळून येतेस?' असा प्रश्न दुर्रानी यांनी विचारला होता. त्यावर, तुम्ही माझ्या साडीवर नव्हे तर कामावर लक्ष द्यायला हवे,असं मी त्यांना म्हटलं होतं."

दरम्यान, लता दीदींनी कायम पांढऱ्या रंगाच्याच साड्या नेसल्या. फक्त त्यांच्या साड्यांना वेगवेगळ्या रंगाची किनार असायची.

टॅग्स :लता मंगेशकरसेलिब्रिटीसंगीतबॉलिवूड