गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा आज म्हणजचे 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच त्यांच्या भावंडांनी देखील संगीतसृष्टीला मोठे योगदान दिले आहे. मीना खर्डीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर अशी त्यांच्या भावंडांची नावे असून या सगळ्यात लता मंगेशकर या मोठ्या आहेत.
लता मंगेशकर या अतिशय लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. सगळ्या भावंडांमध्ये त्या मोठ्या असल्याने घरची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांनी अतिशय कमी वयात चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला कोरसमध्ये गाणे गायले. तसेच काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला. लता मंगेशकर यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नसले तरी त्यांनी त्यांच्या भावंडांना शिक्षण दिले. त्यांनी घरची जबाबदारी खूपच चांगल्याप्रकारे पेलली. लता यांना त्यांच्या भावंडांविषयी अतिशय प्रेम आहे. पण लता आणि त्यांच्या लहान बहीण आशा भोसले या दोघींमध्ये अनेक वर्षं अबोला होता. लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्यासोबत आशा भोसले यांनी खूपच कमी वयात लग्न केले. लग्न झाले त्यावेळी आशा या 16 तर गणपत हे 31 वर्षांचे होते. आशा यांनी लग्न केल्यानंतर कित्येक वर्षं लता आपल्या बहिणीशी बोलत नव्हत्या.
आशा यांनीच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते की त्यांनी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय हा लता मंगेशकर यांना आवडला नव्हता आणि त्याचमुळे त्या दोघींमध्ये कित्येक वर्षं अबोला होता. केवळ लता मंगेशकरच नव्हे तर त्यांच्या घरातील सगळ्यांचाच या लग्नाला विरोध होता.