‘एक प्यार का नगमा है’ हे लता मंगेशकर यांनी गायलेल गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि रानू मंडल अचानक प्रकाशझोतात आली. या व्हिडीओमुळे रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणा-या रानू मंडलचे आयुष्य बदलले. याच रानूला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नुकताच एक सल्ला दिला होता. होय, कुठलीही आणि कुणाचीही नक्कल फार काळ टिकणारी नसते, असे लता दी रानूला उद्देशून म्हणाल्या होत्या.‘माझ्या नावाने आणि मी गायलेल्या गाण्यांनी कुणाचे भले होत असेल तर मला आनंदच आहे. पण गायकी ओरिजिनल नसेल तर यश अल्पजीवी असते’, असे लता दीदी म्हणाल्या होत्या.
लता दींनी रानूला हा सल्ला दिला खरा, पण नेटक-यांना त्यांचा हा सल्ला अजिबात मानवला नाही आणि लता दी सोशल मीडियावर ट्रोल झाल्यात. रानू मंडलकडे गमावण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे तुमच्या या सल्ल्याला अर्थ नाही, अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिता लता दींच्या या सल्ल्यानंतर उमटल्या.
‘लता मंगेशकर यांनी एकेकाळी अनेक नव्या फिमेल सिंगरचे करिअर उद्धवस्त केले. अशात त्या या वयात कुणाला प्रोत्साहन कशा देऊ शकतात,’ असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने लता मंगेशकर यांच्याबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिली. ‘रानू मंडलला तुम्ही दिलेला सल्ला मला अजिबात मान्य नाही. तुम्हाला बोलताना अधिक विनम्र होण्याची गरज आहे,’ असे या युजरने म्हटले. एकंदर काय तर लता दींनी दिलेल्या सल्ल्यावर रानू मंडल अद्याप बोललेली नाही. पण तिच्या वतीने नेटक-यांनी लता यांना उत्तर दिले.रानू मंडलने आत्तापर्यंत हिमेश रेशमियासाठी तीन गाणी रेकॉर्ड केली आहेत. सुरूवातीला रानूने लता मंगेशकर यांची गाणी हुबेहुब त्यांच्यासारखी गाण्याचा प्रयत्न केला. हीच गाणी रानूच्या पोटापाण्याचे साधन बनलीत. ही गाणी ऐकून लोक देतील त्यावर ती रेल्वेस्टेशनवर पोट भरू लागली होती.