गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्या सध्या आयसीयूत आहेत.
डॉ. फारूक इ उडवाडिया लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असून त्यांची तब्येत आता स्थिर असल्याचे म्हटले जात आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातील सूत्रांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मात्र घाबरण्याचे काहीही कारण नाहीये. त्यांची बहीण उषा मंगेशकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की. त्यांची तब्येत आता सुधारत असून त्यांना उद्यापर्यंत डिस्चार्ज देखील देण्यात येईल. लता मंगेशकर यांनी कालच त्यांची भाची पद्मिनी कोल्हापूरेच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर ट्विटरवर शेअर केले होते. आशुतोष गोवारिकरच्या पानिपत या चित्रपटात पद्मिनी गोपिका बाई या भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटासाठी लता यांनी त्यांच्या भाचीला ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या.
लता मंगेशकर या 90 वर्षांच्या असून त्यांनी आजवर अनेक गाणी गायली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.