ठळक मुद्दे.लता दीदी यांनी आत्तापर्यंत १००० हून अधिक गाणी गायली आहेत तर ३६हून अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे.
भारतीय संगीत विश्वाला लाभलेली दैवी सुरांची देगणी म्हणजे लता मंगेशकर. सहा दशकांपेक्षा अधिक काळ भारतीय संगीतप्रेमींचे मनोरंजन करणा-या, आपल्या सुमधूर स्वरांनी रिझवणा-या लता मंगेशकर संगीतविश्वातून निवृत्त घेणार म्हटल्यावर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. होय, सोशल मीडियावर ‘आता विसाव्याचे क्षण’ हे दीदींनी गायलेले मराठी गाणे पोस्ट केले गेले होते. लता दीदींच्या निवृत्तीशी या गाण्याचा संबंध जोडण्यात आला होता. यामुळे लता दीदींचे अनेक चाहते हिरमुसले होते. पण आता खुद्द लतादीदींनी निवृत्तीच्या बातम्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
एका खास मुलाखतीत लता मंगेशकर यांनी निवृत्तीच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. होय, माझ्या निवृत्तीची अफवा कुठून व कशी पसरली मला माहित नाही. कुण्या रिकामटेकड्या मूर्खाचेच हे काम असावे. दोन दिवसांपूर्वी मला अचानक माझ्या निवृत्तीसंदर्भातील फोन व संदेश येणे सुरु झाले. मी गायलेल्या ‘आता विसाव्याचे क्षण’ या गाण्याचा संबंध माझ्या निवृत्तीशी जोडण्यात आल्याचे मला कळले. मी सांगू इच्छिते की, हे गाणे मी पाच वर्षांपूर्वी गायले होते. २०१३ मध्ये संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी हे गाणे घेऊन माझ्याकडे आला होता. मी हे गाणे गायला तयार झाले कारण, हे गाणे प्रसिद्ध कवि बालकृष्ण भगवंत बोरकर यांनी लिहिले होते. मी कधीच त्यांनी लिहिलेली कविता गायली नव्हती. पाच वर्षांनंतर या गाण्याचा संबंध माझ्या निवृत्तीशी जोडला जाईल, हे मला तेव्हा कुठे ठाऊक होते, असे त्या म्हणाल्या. केवळ इतकेच नाही तर, निवृत्ती घेण्याचा माझा कुठलाही इरादा नाही. अखेरच्या श्वासापर्यंत मी गात राहील, अशा शब्दांत त्यांनी आपल्या चाहत्यांना आश्वस्त केले.
१९४२मध्ये एका मराठी चित्रपटात लता दीदींनी पहिले गाणे गायले होते. पण, काही कारणास्तव ते गाणे चित्रपटातून काढून टाकण्यात आले. ‘महल’ चित्रपटातील ‘आएगा आने वाला’ या गाण्यानं लतादीदींना प्रसिद्धी मिळवून दिली.लता दीदी यांनी आत्तापर्यंत १००० हून अधिक गाणी गायली आहेत तर ३६हून अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे.