Join us

Lata Mangeshkar : 'माझी अशी इच्छा आहे की लोकांनी मला...'; लता मंगेशकर यांची एकच होती अखेरची इच्छा....!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 2:43 PM

Lata Mangeshkar Last Wish: लता दीदींच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका जुन्या मुलाखतीच्या या व्हिडीओत लता दीदी स्वत:बद्दल बोलत आहेत. एक इच्छा त्यांनी या व्हिडीओत व्यक्त केली आहे.

Lata Mangeshkar : मंगेशकर कुटुंबात जन्मलेली एक लेक भविष्यात इतकं मोठं नाव कमवेल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. पण तिच्या दैवी आवाजानं अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध केलं. नाव लता मंगेशकर (Lata Mangeshkar). 13 व्या वर्षी वडिलांचं निधन झालं आणि आई, 3 लहान बहिणी व सर्वात धाकटा भाऊ अशा सर्वांची जबाबदारी लता यांच्या खांद्यावर येऊन पडली. लता दीदींनी ही जबाबदारी अगदी शेवटपर्यंत निभावली. त्यांनी गायला सुरूवात केली. यादरम्यान अनेक कठीण प्रसंग आलेत. पण लता दीदी आयुष्यातल्या अनेक कसोटीच्या प्रसंगांना धीरानं सामोऱ्या गेल्या. पण हे करताना त्यांनी कुणाचंही वाईट चिंतलं नाही.

अगदी लता दीदींवर विषप्रयोग झाला होता. स्वत: लता दीदींनी एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला होता. तीन महिने लता दीदी अंथरूणाला खिळून होत्या. हा विषप्रयोग कुणी केला, हे लता दीदींना कळलं होतं. पण त्यांनी त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. अर्थात त्या व्यक्तिविरोधात त्यावेळी त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. पुढे या व्यक्तिलाही लता दीदींनी माफ केलं.

लता दीदींच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका जुन्या मुलाखतीच्या या व्हिडीओत लता दीदी स्वत:बद्दल बोलत आहेत. लोकांनी मला कायम कुणाचंही वाईट न चिंतणारी व्यक्ति म्हणून आठवणीत ठेवावं, अशी इच्छा त्यांनी या व्हिडीओत व्यक्त केली आहे.

लता दीदी म्हणतात...माझी अशी इच्छा आहे की, लोकांनी मला कुणाचंही वाईट न चिंतणारी व्यक्ति म्हणून आठवणीत ठेवावं. मी कधीही कुणाचं वाईट चिंतलं नाही, कुणाचं कधी वाईट केलं  नाही. मी आपल्या गीतांद्वारे देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. मी किती सेवा केली, हे मला माहित नाही. कारण मी चित्रपटांची गाणी गाते. पण यापेक्षा वेगळं काही सांगू इच्छित नाही. मात्र इच्छा खूप आहे..., असं लता दी या व्हिडीओत म्हणत आहेत.

टॅग्स :लता मंगेशकर