गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आता आपल्यात राहिल्या नाहीत. पण त्या आपल्यातून गेल्याही नाहीत. कारण त्या त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून आयुष्यभर आपल्यासोबत राहणार आहेत. त्यांच्या निधनाने जगभरातील त्यांच्या फॅन्सवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. तसेच त्यांच्याबाबतच्या काही किस्स्यांची चर्चाही केली जात आहे. असाच एका किस्सा आहे भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) १९८३ मध्ये वर्ल्डकप जिंकून आली होती तेव्हाचा....
लता दीदी यांचं भारतीय क्रिकेटमध्ये दिलेलं योगदान कधीही विसरलं जाऊ शकत नाही. भारतीय क्रिकेट टीम १९८३ मध्ये जेव्हा चॅम्पियन बनली तेव्हा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डकडे (BCCI) खेळाडूंना देण्यासाठी पैसे नव्हते. जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेली बीसीसीआय त्यावेळी फारच गरीब होती. तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांना खेळाडूंना पुरस्कार द्यायचे होते. पण पैसेच नसल्याने ते चिंतेत होते.
त्यांनी या गंभीर स्थितीतून बाहेर येण्यासाठी गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याकडे मदत मागितली. भारतीय टीमच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी इंदिरा गांधी इनडोर स्टेडिअममध्ये लता मंगेशकर कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. हा कॉन्सर्ट फार हिट ठरला आणि यातून २० लाख रूपये कमाई झाली होती. त्यानंतर बक्षीस म्हणून खेळाडूंना एक-एक लाख रूपये देण्यात आले होते.
(Image Credit : allaboutcric.com)
या कॉन्सर्टमध्ये लता मंगेशकर यांनी अनेक गाणी गायली पण 'भारत विश्व विजेता' हे गाणं फार गाजलं. या गाण्याला संगीत लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. तर गाण्याचे बोल इंदीवर यांनी लिहिले होते. खास बाब म्हणजे जेव्हा लता मंगेशकर हे गाणं गात होत्या तेव्हा भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू मागे लताजींच्या सुरात सूर मिळवत होते.
लता मंगेशकर यांनी या कॉन्सर्टसाठी बीसीसीआयकडून कोणतीही फी घेतली नव्हती. बीसीसीआय आणि तत्कालीन खेळाडूंनी लता मंगेशकर यांचं योगदान नेहमी लक्षात ठेवलं. बीसीसीआयने तर प्रस्ताव दिला होता की, लता दीदी जोपर्यंत जिवंत राहतील तोपर्यंत भारतातील कोणत्या क्रिकेट स्टेडिअममध्ये त्यांच्यासाठी एक सीट रिझर्व राहणार.