स्वर्गीय सूर आज हरपला. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. लता दीदींच्या जाण्यामुळे आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. जगभर आपल्या सुरेल आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांची गाणी आजही सदाबहार असून लोकांच्या ओठांवर रूळताना दिसतात. बॉलिवूडमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. बॉलिवूडमध्ये त्यांना संगीताची देवी म्हटले जाते. पण लता मंगेशकर यांनी गायनासोबतच अभिनयही करत होत्या, हे फार कमी लोकांना माहित आहे.
वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी लता मंगेशकर यांनी अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यावेळी त्या चित्रपटांमध्ये नायक किंवा नायिकेच्या बहिणीची किंवा मैत्रिणीची साईड कॅरेक्टर साकारत होत्या. पण त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांना 'अग्ली गर्ल' म्हणजेच कुरूप मुलगी म्हणत चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या घटनेमुळे लता दीदी खूप संतापल्या होत्या. हे खरंय... आपल्या मधुर आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांना राज कपूर यांनी 'अग्ली गर्ल' म्हटले होते.
लता मंगेशकर यांनाही भावली होती कथाहा किस्सा आहे १९७८ सालचा. 'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटादरम्यान हा प्रकार घडला होता. राज कपूर यांना या चित्रपटात लता मंगेशकर यांना कास्ट करायचे होते. खरंतर या चित्रपटाला एका स्त्रीची गरज होती जिचा आवाज खूप गोड होता आणि तिचा चेहरा सामान्य होता. राज कपूर यांना या चित्रपटात दाखवायचे होते की विश्वास हा शारीरिक सौंदर्यावर नव्हे तर प्रेम आणि निःस्वार्थ संबंधांवर आधारित असतो. लता मंगेशकर यांनाही या चित्रपटाची कथा खूप आवडली आणि त्यांनीही चित्रपटात काम करण्यास होकार दिला.
...नाहीतर लता मंगेशकर नाराज होतील'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटादरम्यान एका मुलाखतीत राज कपूर म्हणाले होते की, "तुम्ही एक दगड घ्या, तो दगड आहे जोपर्यंत त्यावर धार्मिक चिन्ह नाही, नाहीतर तो देव बनतो. अगदी तसंच तुम्ही सुंदर आवाज ऐकला, पण नंतर कळले की तो आवाज एका कुरूप मुलीचा होता." हे सांगितल्यानंतर राज कपूर थांबतात आणि अग्ली गर्लबद्दलची चर्चा काढून टाकायला सांगितला होता. कारण हे ऐकल्यानंतर लता मंगेशकर नाराज होतील.
लता मंगेशकर खूप संतापल्या...'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटाच्या सुरुवातीच्या प्रमोशनदरम्यान लता मंगेशकर यांचा आवाज आणि विरोधाभासी चेहऱ्यामुळे त्यांना कास्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे लता मंगेशकर प्रचंड संतापल्या आणि त्यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यानंतर राज कपूर यांनी लता मंगेशकर यांना चित्रपटात गाणे गाण्यासाठी खूप मनविले होते. मात्र लता मंगेशकर यांनी सुरूवातीला त्यांचे अजिबात ऐकले नाही. मात्र राज कपूर यांच्या अनेक विनंतीनंतर लता मंगेशकर यांनी 'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटाच्या शीर्षक गीताला आपला आवाज दिला. या चित्रपटात नंतर लतादीदींच्या जागी झीनत अमान यांची वर्णी लागली.