Join us

Lata Mangeshkar: गानकोकिळा लता मंगेशकर यांना आवाजामुळेच केलं होतं रिजेक्ट; मग त्याच बनल्या सुरांच्या मल्लिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 12:44 PM

Lata Mangeshkar: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. लतादीदींच्या गाण्यांनी त्यांना कायमचे अमर केले. पण फार कमी लोकांना माहित आहे की, लता मंगेशकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

लता मंगेशकर गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या सुरेल आवाजाने असंख्य लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. देशातच नाही तर परदेशातील लोकदेखील त्यांच्या सुरेल आवाजाने घायाळ झाले आहेत. गायनाची आवड लता मंगेशकर यांना बालपणापासूनच होती. त्यांनी वयाच्या ५व्या वर्षी गायनाला सुरूवात केली होती. पण जेव्हा लता मंगेशकर यांनी पार्श्वगायिका म्हणून सिनेसृष्टीत प्रवेश केला तेव्हा त्यांना त्यावेळी नाकारण्यात आले. कारण त्या वेळी लतादीदींचा आवाज खूपच पातळ मानला जात होता. त्याकाळी नूर जहां आणि शमशाद बेगम यांसारख्या भारदस्त आवाज असणाऱ्या गायकांचा दबदबा होता. 

चित्रपटातही केलंय काम

पार्श्वगायिका होण्यापूर्वी लता मंगेशकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असल्याचेही अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. वृत्तानुसार, १९४२ मध्ये लता मंगेशकर यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लता मंगेशकर यांनी चित्रपटांमध्ये काम केले. रिपोर्ट्सनुसार, लतादीदींनी १९४२ ते १९४८ या काळात ८ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याच्या एकाही चित्रपटातून त्यांना यश मिळाले नाही.

पहिलंच गाणं झालं नाही रिलीजजेव्हा लता मंगेशकर यांना चित्रपटांमध्ये यश मिळाले नाही, तेव्हा त्यांनी मराठी चित्रपटात पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले, परंतु त्यांचे पहिले गाणे चित्रपटातून वगळण्यात आले. या गाण्याचे नाव होते नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी. सदाशिवराव नेवरेकर यांनी १९४२ मध्ये रिलीज झालेल्या किट्टी हसल या मराठी चित्रपटासाठी हे गाणे संगीतबद्ध केले होते.

अशारितीने लता मंगेशकर बनल्या सुरांच्या मल्लिका!

लतादीदींच्या आयुष्यातील हे पहिलं गाणं कधीच रिलीज होऊ शकलं नसलं, तरी पार्श्वगायिका म्हणून त्यांचा प्रवास इथून सुरू झाला आणि मग त्यांनी एका पाठोपाठ एक गाणं म्हणायला सुरुवात केली, आपल्या सुमधुर आवाजाची छाप सोडली आणि गाणं लोकांच्या मनावर उमटलं. लता मंगेशकर यांनी आपल्या हजारो गाण्यांतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यांनी गायलेले गाणे लग जा गले..., भीगी-भीगी रातों में..., तेरा बिना जिंदगी से..., अजीब दास्तां है ये..., तुम आ गए हो नूर आ गया है..., एक प्यार का नगमा है..., तुझसे नाराज नहीं जिंदगी या गाण्यांसह हजारो त्यांची गाणी सुपरहिट ठरली. आजही ही गाणी अनेकांच्या ओठांवर रुळताना दिसतात आणि अशारितीने लता मंगेशकर सुरांच्या मल्लिका बनल्या होत्या.

टॅग्स :लता मंगेशकर