स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं एक तरल, सुरेल गाणं ‘लस्ट स्टोरीज’ या सिनेमात हस्तमैथुनाच्या दृश्यावेळी वापरल्यानं मंगेशकर कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. करण जोहरची याबद्दल त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली होती. आता एका रिमिक्स गाण्यामुळे खुद्द लता मंगेशकर यांनी जाहिर नाराजी बोलून दाखवली आहे.
होय,बॉलिवूडच्या ‘मित्रो’ या आगामी चित्रपटात ‘चलते चलते’ या गाजलेल्या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन वापरण्यात आले आहे. याच गाण्यावरून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘चलते चलते’ हे ‘पाकिजा’ चित्रपटातील एक अजरामर गीत़ हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या ‘पाकीजा’तील हे गाणे गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केले होते आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ते स्वरबद्ध केले होते. मात्र, ‘मित्रो’मध्ये या अजरामर गीताचे रिमिक्स व्हर्जन वापरले आहे. पाकिस्तानी गायक आतिफ असलम याने या गाण्याला रिमिक्स टच दिला आहे. लता मंगेशकर यांनी या गाण्याबद्दल जाहिरपणे नाराजी व्यक्त केली आहे.मला हे गाणेही ऐकण्याचीही इच्छा नाही. गाण्यांच्या रिमिक्सचा हा ट्रेंड पाहून मला प्रचंड वेदना होतात. रिमिक्सच्या नावाखाली जुन्या अजराअमर गाण्यांच्या चाली बदलण्यात कसली आली सर्जनशीलता? या गाण्यांच्या चाली आणि शब्द बदलण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिलेत? असा उद्विग्न सवाल लता मंगेशकरांनी केला आहे.आतिफ अस्लमने ‘चलते चलते’ या मूळ गाण्यात बरेच बदल केले आहेत. ‘चलते चलते यु ही कोई मिल गया था’ ही एक ओळ कायम ठेवून गाण्यातील शब्दही बदलण्यात आले आहेत. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, याचे संगीतकार म्हणून तनिष्क बागची याला श्रेय देण्यात आले आहे.