Join us

लता मंगेशकर यांचे ट्विट, ‘दिलीपकुमारजींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना’!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2017 1:27 PM

गेल्या बुधवारपासून लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांची प्रकृती ठणठणीत व्हावी म्हणून ...

गेल्या बुधवारपासून लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांची प्रकृती ठणठणीत व्हावी म्हणून देशभर त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे. आता गानकोकिळा लता मंगेशकर यांनीही ‘दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते’ अशा आशयाचे ट्विट केले आहे. वास्तविक दिलीपकुमार गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. परंतु बॉलिवूडमधील एकही सेलिब्रिटी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले नाही; अशात लतादीदींनी केलेले ट्विट महत्त्वपूर्ण ठरत आहे. लतादीदींनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘मुझे न्यूज देखकर पता चला की दिलीपकुमार जी की तबियत ठीक नही है. उनकी सेहत में जल्द सुधार हो, ये मेरी ईश्वर से प्रार्थना है.’ गेल्या बुधवारी डिहाड्रेशन आणि किडनीच्या त्रासामुळे दिलीपकुमार यांना रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी सकाळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना स्पेशल रूममध्ये हलविण्यात आले होते. परंतु पुन्हा सायंकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करावे लागले. बॉलिवूडचे सुपरस्टार असलेले दिलीपकुमार गेल्या चार दिवसांपासून बांद्रा परिसरातील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. या रुग्णालयापासून अगदी पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची घरे आहेत. शाहरूख खान, सलमान खान, संजय दत्त, रेखा, जॅकी श्रॉफ, नसिरुद्दीन शाह यांच्यासह अनेक बड्या कलाकारांची घरे याच परिसरात आहेत. परंतु अशातही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कोणी रुग्णालयात पोहोचले नाही. खरं तर याचे हेदेखील कारण असू शकते की, रुग्णालयात व्हीआयपी गेस्ट आल्यास रुग्णालय प्रशासनाची प्रचंड जबाबदारी वाढते. कदाचित याच कारणामुळे दिलीपकुमार यांच्या परिवाराला रुग्णालय परिवाराने अपील केले असावे, की कमीत कमी लोकांनी रुग्णालयात दिलीपकुमार यांना भेटण्यासाठी यावे. शिवाय दुसरे कारण असेही असू शकते की, दिलीपकुमार आयसीयूमध्ये दाखल असल्याने त्यांना भेटण्यास प्रवेश नसावा. असो, दिलीपकुमार यांचे इंडस्ट्रीमधील योगदान पाहता, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, ही अपेक्षा त्यांच्या चाहत्यांसह संबंध बॉलिवूड करीत असावा, यात शंका नाही.