सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या धक्क्यातून अद्यापही चाहते सावरलेले नाहीत. आता त्याच्या एका चाहत्याने थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. होय, सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा अखेरचा सिनेमा चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित करावा, अशी मागणी या चाहत्याने मानवाधिकार आयोगाकडे केली आहे. एखादा चित्रपट थेट चित्रपटगृहांत रिलीज व्हावा यासाठी मानवाधिकार आयोगाला साकडे घालण्याची कदाचित भारतीय सिने इतिहासातील ही पहिली वेळ असावी.मानवाधिकार आयोगास विनंती करण्या-या या चाहत्याचे नाव आशीष राय आहे. मुंबई युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे. आशीष स्वत:ला सुशांतचा सर्वात मोठा चाहता मानतो. सुशांतचा अखेरचा सिनेमा ओटीटीवर नाही तर चित्रपटगृहांत रिलीज व्हावा, हीच त्याला सर्वात मोठी श्रद्धांजली ठरेल. त्याला खरी श्रद्धांजली द्यायची तर हा सिनेमा चित्रपटगृहांतच रिलीज केला जावा, असे त्याने म्हटले आहे. एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना व्हायरसमुळे तूर्तास चित्रपटगृहे बंद आहेत. पण ती कधी तरी उघडणार. त्यामुळे सुशांतचा ‘दिल बेचारा’ रिलीज करण्यासाठी चित्रपटगृहे उघडण्याची प्रतीक्षा केली जावी. सुशांतचीही कदाचित हीच इच्छा असावी. माझ्या सारख्या अनेक चाहत्यांनी ही मागणी लावून धरली आहे. सोशल मीडियावर ही मागणी जोर धरू लागली आहे. लोकांच्या भावना लक्षात घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यात लक्ष घालावे, असे म्हणाला.
हे प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्यक्षेत्राबाहेरची आहे, याकडे लक्ष वेधले असता आशीष म्हणाला की, मला त्याची कल्पना आहे. पण सुशांतच्या चाहत्यांच्या भावना लक्षात घेत मी मानवाधिकार आयोगाला पत्र लिहिले आहे. माझ्या या पत्राची मानवाधिकार आयोग दखल घेईल, अशी आशा मला आहे.दिल बेचारा हा सुशांतचा सिनेमा येत्या 24 जुलै रोजी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.