बॉलिवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. बाबा सिद्दिकींची हत्या केल्यानंतर सलमानला पुन्हा बिश्नोईकडून धमकी देण्यात आली आहे. काळवीटची शिकार केल्याप्रकरणी सलमानला या धमक्या मिळत आहे. काळवीटची पूजा करणाऱ्या बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्याने सलमानला माफी मागण्यासही सांगण्यात आलं होतं. आता लॉरेन्स बिश्नाईच्या भावाने सलमानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. काळवीटची शिकार केल्यानंतर सलमानने बिश्नोई समाजाला पैशाची ऑफर दिल्याचा दावा त्याने केला आहे.
लॉरेन्सचा भाऊ रमेश बिश्नोईने नुकतीच एनडीटीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सलमानने बिश्नोई समाजाला पैसे ऑफर केले होते. पण, आम्ही ते घेण्यास स्पष्ट नकार दिल्याचं सांगितलं. तो म्हणाला, "सलमानचे वडील सलीम खान म्हणाले की लॉरेन्सची गँग पैशासाठी हे सगळं करत आहे. मी त्यांना याची आठवण करू देऊ इच्छितो की त्यांचा मुलगा बिश्नोई समाजाकडे चेक बुक घेऊन आला होता. जेवढे पैसे हवेत तेवढी अमाऊंट टाका, असं तो म्हणाला होता. जर आम्हाला पैसे हवे होते, तर आम्ही तेव्हाच घेतले असते".
बिश्नोई समाज प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी स्वत:च्या जीवाचीही बाजी लावतात. त्यामुळे काळवीटची शिकार केल्याने बिश्नोई समाजाचं रक्त उसळलं होतं, असंही रमेश बिश्नोईने सांगितलं. "जेव्हा सलमानने काळवीटची हत्या केली तेव्हा आमचं रक्त सळसळत होतं. पण, आम्ही याचा न्यायनिवाडा कोर्टवर सोडला आहे. जर तुम्ही संपूर्ण समाजाची खिल्ली उडवत असाल तर समाजात नाराजी पसरणं स्वाभाविक आहे. म्हणूनच आज यासाठी बिश्नोई समाज लॉरेन्ससोबत आहे", असं तो पुढे म्हणाला.
१९९८ साली हम साथ साथ है सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमानने काळवीटची शिकार केली होती. याप्रकरणी सलमानला अटकही करण्यात आली होती. पण, पुराव्यांच्या अभावी सलमानची सुटका झाली होती. ही घटना घडली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई ५ वर्षांचा होता. आता तो जेलमध्ये असला तरी वारंवार सलमानला धमक्या देत आहे. सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेरही बिश्नोईकडून हवेत गोळीबार करण्यात आला होता.