कोरोना महामारीचा फटका सर्वांनाच बसला आहे. लाखो लोक कोरोनाने ग्रस्त आहेत. अनेकांचे बळी गेले आहेत. कोरोना पॉझिटिव्हची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आता एका दिग्दर्शकाच्या अनाथाश्रमात राहाणाऱ्या १८ लहान मुलांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स यांनी केले आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून अनाथाश्रम चालवतात. त्यांच्या अनाथाश्रमातील १८ मुलांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनीच ही गोष्ट सोशल मीडियााद्वारे सांगितली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, एका आठवड्यापूर्वी अनाथाश्रमातील काही मुलांना ताप आला होता. त्यामुळे अनाथाश्रमातील सगळ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १८ मुलांना आणि तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे लक्षात आले. सध्या या मुलांवर उपचार सुरू असून त्यांची तब्येत सुधारत आहे. अनेकांचा ताप देखील कमी झालेला आहे. त्यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल. मी अनेक वर्षांपासून करत असलेल्या समाजसेवेमुळे माझ्या मुलांना लवकरच बरं वाटेल अशी मी आशा करतो. या सगळ्यात माझ्या मुलांना तातडीने मदत दिल्याबद्दल मी एस.पी. वेलुमणी यांचे आभार मानतो.
समाजकार्य करण्यात राघव हे नेहमीच पुढाकार घेतात. त्यांनी कोरोनाच्या लढ्यासाठी सरकारला तीन कोटी रुपयांची मदत केली आहे.