Join us

जाणून घ्या अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी काय करायचा आर. माधवन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 9:50 AM

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. मात्र आपली अभिनयाचं स्वप्न साकारण्याआधी चित्रपटसृष्टीतील सर्वच ...

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. मात्र आपली अभिनयाचं स्वप्न साकारण्याआधी चित्रपटसृष्टीतील सर्वच कलाकारांनी कधीच आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. बहुतांशी कलाकार हे उच्चशिक्षित आहेत. प्रतिष्ठित शाळा आणि कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. मात्र यापैकी एक कलाकार थोडा वेगळा आहे. त्याच्या शैक्षणिक जीवनात अनेक चढउतार आले. या कलाकाराचं नाव आहे अभिनेता आर. माधवन. त्याची गणना बॉलिवूडच्या उच्चशिक्षित अभिनेत्यांमध्ये होते. त्याने इलेक्ट्रॉनिक्स या विषयात पदवी घेतली आहे. मात्र त्याच्या शालेय जीवनातील एक गोष्ट तुम्हालाही आश्चर्याचा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. आर. माधवन शालेय जीवनात एकदा नाही तर दोनदा नापास झाला आहे पहिल्यांदा आठव्या इयत्तेत तर दुस-यांदा दहावीत माधवन नापास झाला. मात्र दोनदा नापास झाल्यानंतरही माधवननं कधीच हार मानली नाही. अपयशाने माधवन खचला नाही. त्यानं पुन्हा जोमानं अभ्यास केला आणि दहावीचा टप्पा पार केला. मात्र फिजिक्स आणि गणित या विषयात कमी गुण असल्याने त्याला इंजीनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही. कठोर मेहनतीनंतर त्याने प्रचंड मेहनत घेतली आणि कोल्हापूरच्या एका इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. याच कॉलेजमधून माधवनने इलेक्ट्रॉनिक्सची पदवी घेतली. नौदल, लष्कर आणि हवाई दलाचेही त्याने प्रशिक्षण घेतले आहे. सांस्कृतिक अॅम्बेसेडर रुपात त्याने कॅनडामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी माधवन व्यक्तीमत्त्व विकास अर्थात पर्सनालिटी डेव्हल्पमेंटचे क्लासेस घ्यायचा. रहेना हैं तेरे दिल में या सिनेमातून त्याने बॉलीवुडमध्ये एंट्री केली. पहिल्याच सिनेमातील आपल्या अभिनयाने माधवनने रसिकांची मने जिंकली. याशिवाय थ्री इडियट्स, रंग दे बसंती, दिल विल प्यार व्यार, तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु रिटर्नस, गुरु अशा विविध सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. शांती शांती शांती, एन्नावले, कन्नाथिल मुथामित्तल अशा कितीतरी दाक्षिणात्य सिनेमातही माधवनने भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनयाने अभिनेता म्हणून रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारा माधवन सा-यांसाठी आदर्श आहे. मात्र दोनदा नापास होऊनही इंजीनिअर बनलेला आणि त्यानंतर अभिनेता म्हणून नाव कमावलेला माधवन अपयशाने खचून जाणा-या अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरु नये.