Paresh Rawal: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी परेश रावल यांचे नाव आदराने घेतले जाते. इतकेच नाही, तर ते भाजप खासदारही आहेत. एका कार्यक्रमात बोलताना परेश रावल यांनी आठवणींना उजाळा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची स्तुती केली आहे. शरद पवार यांच्यासारखा मोठा नेता नाटकवाल्यांसाठी पुढे येतो, हे पाहूनच मी थक्क झालो, असे परेश रावल यांनी म्हटले आहे.
परेश रावल म्हणाले की, नाट्यव्यवसायावरील वस्तू, सेवा कर रद्द करावा यासाठी मी अजित भुरेंसह इतर मराठी रंगकर्मींबरोबर तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हेदेखील बरोबर होते. शरद पवारांसारखा मोठा नेता नाटकवाल्यांसाठी पुढे येतो, हे पाहूनच थक्क झालो. त्यांनी ज्याप्रकारे जीएसटी रद्द करण्यासाठी जेटली यांना मनवले, ते वाखाणण्याजोगे होते. त्यावेळी सहज त्यांना म्हणालो की, हे तुमचे मतदार नाहीत, तरी तुम्ही पुढाकार घेतला, यावर, उत्तर देताना, हा कला व संस्कृतीचा मुद्दा आहे, असे शरद पवारांनी सांगितले. त्यांच्या या उत्तराने मी भारावून गेलो होतो, असेही परेश रावल यांनी नमूद केले. लोकसत्ता आयोजित कार्यक्रमात परेश रावत बोलत होते.
दरम्यान, चतुरस्र अभिनेते परेश रावल यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. गेली अनेक दशके आपल्या भूमिकांमधून परेश रावल यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. परेश रावल आता ‘शहजादा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"