Join us

- म्हणून जगापासून लपवून झाले होते राजकुमार यांच्यावर अंत्यसंस्कार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 8:00 AM

राजकुमार स्वत:च्या अटींवर जगले आणि जगाचा निरोप घेतला तो सुद्धा स्वत:च्या अटींवर..

ठळक मुद्देराजकुमार यांच्या आवाजातील डायलॉग ऐकणं म्हणजे, एक वेगळीच अनुभूती होती. प्रेक्षक त्यांच्या याच आवाजाचे फॅन होते. याच आवाजाला लोकांनी भरभरून प्रेम दिले. पण दुर्दैव म्हणजे, हाच आवाज कॅन्सरनं क्षीण केला.

सुटाबुटात आणि मोठ्या रुबाबात हातातला पाईप सावरत पडद्यावर त्यांची एन्ट्री व्हायची आणि त्यांच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्या पडायच्या. टाळ्या आणि शिट्ट्यांनी अख्खं थिएटर दणाणून जायचं. आम्ही बोलतोय ते जानी... अर्थात राजकुमार (Rajkumar ) यांच्याबद्दल. पडद्यावर राजकुमार यांचा वेगळाच रूबाब होता. ख-या आयुष्यातही त्यांचा तेवढाच रूबाब होता. वाचून आश्चर्य वाटेल पण, सिनेमात काम मिळेपर्यंत राजकुमार यांनी सिनेमा पाहिलाच नव्हता. अर्थात याऊपरही सिनेमात आल्यानंतर ते त्यांच्या अटींवर जगले. स्वत:च्याच अटींवर त्यांनी सिनेमे केलेत.

माहिम पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर  ते बॉलिवुडचा सुपरस्टार हा त्यांचा प्रवास थक्क करणारा  आहे. राजकुमार यांचे खरे नाव कुलभूषण पंडित. सिनेमा कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे त्यात काम करण्याची त्यांची कधीच इच्छा नव्हती. पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं. पोलीस स्टेशनच्या समोर शेख नावाचे मेजिस्ट्रेट पदावर काम करणारे व्यक्ती राहायचे. त्यांच्या भावाची फिल्म इंडस्ट्रीतल्या काही लोकांशी ओळख होती. तो अधून मधून राजकुमार यांच्याकडे पोलीस स्टेशनमध्ये गप्पा मारायला यायचा. साहेब तुमचा आवाज, तुमची स्टाईल एकदम वेगळी आहे. तुम्ही चित्रपटांत काम का नाही करत? असं तो सतत राजकुमार यांना म्हणायचा. त्यानेच राजकुमार यांचे फोटो आपल्या ओळखीच्या काही दिग्दर्शकांकडे दिलेत आणि अचानक एक दिवस  दिग्दर्शक नज्म नक्वी  माहिम पोलीस ठाण्यात पोहोचले. नज्म नक्वी यांनी राजकुमार यांना सिनेमात काम करण्यासाठी तयार केलं आणि  ‘रंगिली’ या चित्रपटात राजकुमार यांची वर्णी लागली. पुढे पैगाम, दिल अपना प्रित पराई, हमराज, वक्त,  नीलकमल, हिर रांझा, पाकिजा, बुलंदी, सौदागर, तिरंगा असे किती तरी सुपरहिट सिनेमे राज कुमार यांनी दिले. राजकुमार यांनी अनेक डायलॉग अजरामर केले.

राजकुमार यांच्या आवाजातील डायलॉग ऐकणं म्हणजे, एक वेगळीच अनुभूती होती. प्रेक्षक त्यांच्या याच आवाजाचे फॅन होते. याच आवाजाला लोकांनी भरभरून प्रेम दिले. पण दुर्दैव म्हणजे, हाच आवाज कॅन्सरनं क्षीण केला. होय, आयुष्याच्या अखेरच्या काळात राजकुमार यांना घशाचा कॅन्सर झाला. यामुळे आवाज गेला, शरीर खंगलं. मृत्यूनंतर राजकुमार यांच्यावर अत्यंत गुप्त पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यात आलेत. यावेळी फक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यच तेवढे उपस्थित होते.

राजकुमार यांच्यावर  इतके गुप्तपणे अंतिम संस्कार का केले गेलेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर त्यामागेही कारण होतं. खुद्द राजकुमार यांनीच मृत्यूपूर्वी तसं सांगून ठेवलं होतं.  

आपल्या आजारपणाबद्दल कोणालाही कळू नये, अशी राजकुमार यांची इच्छा होती. राजकुमारला घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्या काळात त्याला खाण्यापिण्यापासून श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. राजकुमारची तब्येत सतत खालावत चालली होती, अशा परिस्थितीतही  आपल्या आजाराबद्दल कोणालाही कळू नये अशी त्यांची इच्छा होती.  घशातील कर्करोगामुळे राजकुमार यांची प्रकृती सतत खालावत होती. अन्नपाणीही नीट जात नव्हतं अशात 3 जुलै 1996 रोजी राजकुमार यांनी जगाला निरोप घेतला. विशेष म्हणजे, मृत्यूची चाहूल त्यांना आधीच लागली होती. मृत्यूच्या काही तास आधी त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना बोलावलं.  ‘मी आज रात्री निघून जाईल आणि माझ्या मृत्यूची बातमी माझ्यावर अंतिम संस्कार झाल्यावरच सगळ्यांना सांगा. मृत्यूनंतर मला जाळून टाका, पण माझ्या मृ:त्यूबद्दल कोणालाही माहिती देऊ नका, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या याच अंतिम इच्छेखातर त्यांच्यावर अगदी गुप्तपणे अंतिम संस्कार झाले. राजकुमार यांना खोटी सहानुभूती नको होती. बॉलिवूडचा दिखाऊपणा त्यांना सहन व्हायचा नाही. त्यांनी कधीच मीडियाला मुलाखत दिली नाही. कदाचित मृत्यूचा तमाशा होऊ नये, हीच त्यांची इच्छा असावी....

टॅग्स :राज कुमार