Liger Money Laundering Probe: साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडाचा ( Vijay Deverakonda) ‘लाइगर’ (Liger) हा सिनेमा आला आणि आला तसा फ्लॉप झाला. पण आता इतक्या दिवसानंतर देवरकोंडाचा हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. होय, आता या चित्रपटाबद्दल एक शॉकिंग माहिती समोर आली आहे. ‘लाइगर’मुळे विजय देवरकोंडा अडचणीत आला आहे. होय, या चित्रपटामुळे विजय देवरकोंडाला आज बुधवारी हैदराबादेत ईडीसमोर हजर व्हावं लागलं.
या चित्रपटासाठी काळ्या धनाचा वापर झाल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी ईडीने चित्रपटाशी संबंधित पैशांच्या स्रोतांची चौकशी सुरू केली आहे. ईडीने अलीकडेच सिनेमाचा दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि त्यांची व्यावसायिक भागीदार चार्मी कौर यांची जवळपास 12 तास चौकशी केली होती. आज विजय देवरकोंडाही ईडीसमोर हजर झाला. येत्या दिवसांत माइक टायसन व इतर कलाकारांचीही याप्रकरणी चौकशी होणार असल्याचं कळतंय.
‘लाइगर’मध्ये विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, राम्या कृष्णन आणि माइक टायसन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 25 ऑगस्ट 2022 रोजी पाच भाषांमध्ये हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला परंतु चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. ‘लाइगर’ स्पोर्ट्स ड्रामा होता. सिनेमाचं बरचंस शूटिंग यूएसमध्ये लास वेगास याठिकाणी झालं होतं. या शूटिंग शेड्युलचा बजेट जवळपास 125 कोटी होता. सिनेमाचं देशभरात जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं.
ईडीने 15 दिवसांपूर्वी पुरी जगन्नाथ आणि चार्मीला नोटीस बजावून हजर राहण्यास सांगितले होते. अनेक राजकीय नेते आणि कंपन्यांनी ‘लाइगर’ बनवण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित केल्याचाही अधिकाऱ्यांना संशय आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी परदेशातून पैसे मागवण्यात आले. 1999 च्या फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) अंतर्गत, चित्रपट बनवण्यासाठी परदेशी स्रोत वापरणं हा गुन्हा मानला जातो. यामुळेच ईडीने गुंतवणूकदारांच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी पुरी जगन्नाथ आणि चार्मीला समन्स बजावले होते. या चित्रपटासाठी आलेल्या फंडिंगमध्ये ‘फेमा’चे काही उल्लंघन झाले आहे का याचा तपास करण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहेत.