'याराना' आणि या सिनेमातील 'सारा जमाना' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. या गाण्यात बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या डान्सची चर्चा झालीच. पण जास्त चर्चा झाली त्यांनी परिधान केलेल्या लाईटवाल्या जॅकेटची. आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात हे जॅकेट परिधान करुन डान्स करण्याची क्रेझ आहे. १९८१ साली आजच्याइतकी आधुनिक टेक्नॉलॉजी नसतानाही 'याराना'मधलं लाईटवालं जॅकेट कसं बनवलं गेलं? याचा किस्सा बिग बींनी सांगितलाय.
असं बनवलं गेलं सारा जमानामधलं लाईट जॅकेट
'याराना' सिनेमातलं 'सारा जमाना' गाणं आणि या गाण्यात अमिताभ बच्चन यांनी परिधान केलेल्या जॅकेटची खूप चर्चा झाली. 'केबीसी १६' च्या मंचावर अमिताभ यांनी हा किस्सा सांगितला. त्या काळात तंत्रज्ञान इतकं आधुनिक नव्हतं. जॅकेटमध्ये बल्ब लावले होते आणि त्यांना विजेच्या तारेने जोडलं गेलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या पायाच्या ठिकाणी विजेच्या वायर्स होत्या. विजेच्या तारांना सेटवरील मुख्य कनेक्शनशी थेट जोडण्यात आलं होतं.
अमिताभ यांना बसत होते विजेचे झटके
अमिताभ डान्सचा अनुभव सांगताना पुढे म्हणाले, "या जॅकेटमधील लाईट जशी सुरु झाली तेव्हा मी डान्स करायला लागलो. मला नाचायची इच्छा होती म्हणून मी नाचत नव्हतो तर, मला नाचता नाचता विजेचा शॉक लागत होता. विजेचे हे झटके मला नाचवत होते." असा खुलासा अमिताभ बच्चन यांनी केला.कोलकातामधील सुभाषचंद्र बोस स्टेडियममध्ये हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. १९८१ साली आलेल्या 'याराना' सिनेमाचं दिग्दर्शन राकेश कुमार यांनी केलं होतं. अमिताभ, अमजद अली, तनुजा, नीतू कपूर या कलाकारांची सिनेमात प्रमुख भूमिका होती.