मुंबई - अभिनेता रितेश देशमुख त्याला जीवनात मिळालेल्या यशाचं श्रेय वडील विलासराव देशमुख यांना देत असतो. आताही एका कार्यक्रमामध्ये रितेश देशमुखने वडिलांविषयीच्या आठवणी जागवल्या आहेत. त्यात त्याने वडिलांनी दिलेल्या जीवनाला कालटणी देणा्या किश्श्याचा उल्लेख केला आहे. तू तुझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची काळजी घेईन, असा सल्ला विलासरावांनी पहिल्या चित्रपटावेळी रितेशला दिला होता, त्यांच्या त्या सल्ल्यामुळे आपलं आयुष्य बदललं, असे रितेश देशमुखने सांगितले.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात रितेश देशमुख सपत्निक सहभागी झाला होता. त्यावेळी वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणी जागवताना रितेश देशमुख म्हणाला की, जेव्हा मला पहिल्या चित्रपटासाठी ऑफर मिळाली, तेव्हा मी ही गोष्ट माझ्या वडिलांना सांगण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला तू तझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची काळजी घेईन, असा सल्ला दिला. त्यांनी दिलेला हा सल्ला मला नेहमीच प्रेरणा देत असतो. जीवनात जे काही करायचं असतं, त्याची जबाबदारी आपणच घेणे आवश्यक असते, असे रितेशने यावेळी सांगितले.
याबाबत सविस्तर बोलताना रितेश देशमुख म्हणाला की, मला पहिल्या चित्रपटासाठी ऑफर आली होती. त्या ऑफरबाबत बोलायला गेलो तेव्हा संबंधितांनी ही ऑफर पक्की असल्याचे सांगितले. मात्र मीच थोडा विचार करण्यासाठी वेळ घेतला. मग धघरी बोललो. आईशी बोलल्यावर तिने होकार दिला. मात्र तेव्हा माझे वडील विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांचे मत जाणून घेणे आवश्यक होते. मी वर्षा बंगल्यावर त्यांना भेटलो. तसेच चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी मला तू अभिनय करणार का? अशी विचारणा केली. तेव्हा मी होकार दिला. मात्र माझा चित्रपट चालला नाही तर लोक तुम्हाला नाव ठेवतील, अशी भीती व्यक्त करून दाखवली. तेव्हा त्यांनी, मला तू तझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची काळजी घेईन, असा सल्ला दिला. त्यानंतर हा चित्रपट फायनल झाला, असेही रितेश देशमुखने सांगितले.