महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असा नावलौकिक मिळवलेल्या, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारां'(LMOTY 2023)चा भव्य सोहळा २६ एप्रिल २०२३ रोजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांमधील दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राज ठाकरे यांची महामुलाखत होणार आहे. या मुलाखतीतून कोणती 'राज की बात' उघड होणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. या सोहळ्याला झगमगत्या जगतातील वरुण धवन आणि रितेश देशमुख हजेरी लावणार आहे.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता वरुण धवन आणि अभिनेता रितेश देशमुख हजेरी लावणार आहे. यावेळी त्यांच्याशी हितगुज करण्यात येणार आहे. मागच्या वर्षी कलाविश्वातून कियारा आडवाणी आणि रणवीर सिंगने हजेरी लावून या सोहळ्याला चारचाँद लावले होते.
लोकसेवा/समाजसेवा, प्रशासन, राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, क्रीडा या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचा झेंडा देशातच नव्हे तर जगात फडकवणाऱ्या गुणवंतांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारानं गौरवण्यात येतं. या सोहळ्यातील अनेक मुलाखती गाजल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गेल्या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली होती. त्याआधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी घेतलेली देवेंद्र फडणवीसांची मुलाखत, रितेश देशमुखने घेतलेली देवेंद्र आणि अमृता फडणवीसांची मुलाखतही खूप चर्चेत आली होती. त्यामुळे यावेळची राज ठाकरेंची महामुलाखतही एकदम हटके असेल.