अमिताभ बच्चन व आयुषमान खुराणा यांच्या गुलाबो सिताबोनंतर आता विद्या बालनचा शकुंतला देवी चित्रपट थिएटरमध्ये नाही तर OTTवर रिलीज होणार आहे. अॅमेजॉन प्राइमने या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरची घोषणा केली आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आाली नाही.
विद्या बालनने इंस्टाग्रामवर याची माहिती देत लिहिले की, मला हे सांगताना आनंद होतो आहे की शकुंतला देवी लवकरच प्राइम व्हिडिओवर आपल्या कुटुंबासोबत पाहू शकता. लॉकडाउनच्या काळात मनोरंजन करू शकतो यामुळे मी खूप खूश आहे.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये विद्या बालनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ रिलीज केला होता आणि हा सिनेमा 8 मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना व्हायरसच्या महारोगराईमुळे लॉकडाउन जाहीर केले आणि शूटिंग व थिएटरदेखील बंद करण्यात आले. 13 मार्चनंतर एकही चित्रपट रिलीज झाला नाही. या चित्रपटात विद्यासोबत जिसु सेनगुप्ता आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘हयूमन कम्प्युटर’ नावाने प्रसिद्ध असलेल्या शकुंतला देवींची महान आणि प्रेरणादायी कहाणी या चित्रपटातून मांडलेली असेल.शकुंतला देवीने अगदी लहानपणापासूनच झटपट आकडेमोड करण्याच्या आपल्या प्रज्ञेने जगाला टक्का करून सोडले होते. कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नसताना शकुंतला देवींचे नाव जगभरात ‘गणितज्ज्ञ’ म्हणून गाजले. त्यांच्या आकडेमोड करण्याच्या अद्भुत कौशल्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने देखील घेतली. अभिनेत्री विद्या बालन शकुंतला देवींची प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे.
विद्या बालनचे चाहते या चित्रपटाच्या रिलीज डेटची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.