एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे लॉकडाऊन अशा कात्रीत अडकलेली अनेक कुटुंबे सध्या बिकट परिस्थितीतून जात आहेत. सुदैवाने या गरजवंतासाठी मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याचे नाव या यादीत आवर्जुन घ्यावे लागेल. लॉकडाऊनमुळे पनवेलच्या फार्महाऊसवर अडकून पडलेला भाईजान आता येथील आजुबाजूच्या खेड्यांतील गावक-यांच्या मदतीला पुढे सरसावला आहे. या गावांतील शेकडो लोकांना सलमानने अन्नधान्याची मदत केली. सलमानने स्वत: या मदतीचे वाटप केले आणि गावकरी भारावले.
गावकरी आपआपल्या बैलगाड्या घेऊन फार्म हाऊसवर आलेत. या सगळ्यांना सलमानने अन्नधान्य व अन्य आवश्यक साहित्याचे वाटप केले. लॉकडाऊनमुळे सलमान पनवेलच्या फार्म हाऊसवर अडकून पडला आहे. त्याच्यासोबत यूलिया वंतूर, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि अन्य काहीजण आहेत. सलमानसोबत या सगळ्यांनी काल मानवी साखळी करून गावक-यांना मदत दिली. इतकेच नाही तर मदत वाटपानंतर सलमानने सर्व गावक-यांना हात जोडून धन्यवाद दिलेत. मदत स्वीकारण्यासाठी आलेल्या गावक-यांना रवाना करेपर्यंत तो थांबला. सलमानचे हे अनोखे रूप पाहून प्रत्येकजण भारावला नसेल तर नवल.
याआधी सलमान बॉलिवूड इंडस्ट्रीतील कामगारांच्या मदतीला धावून आला. सलमानच्या बीइंग ह्युमन या एनजीओने फिल्म इंडस्ट्रीतील 25 हजार लोकांना आर्थिक मदत केली. याद्वारे या लोकांच्या खात्यात रोख रक्कम जमा करण्यात आली. सलमानशिवाय बॉलिवूडचे अनेक दिग्गज अभिनेत्यांनीही या संकटात मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षय कुमार, शाहरूख खान अशा अनेकांची नावे या यादीत आहेत. पीएम केअर्स फंडात 25 कोटी दिल्यानंतर अक्षयच्या मदतीचा ओघ अद्यापही सुरु आहे. शाहरूखही विविध रूपात मदत पोहोचवत आहे.