बिहारमधील पाटणा साहिब मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा दोन लाख ८४ हजार ६५७ मतांनी मोठा विजय झाला आहे. विद्यमान खासदार काँग्रेसचेशत्रुघ्न सिन्हा यांना पराभवचा धक्का सहन करावा लागला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर ही जागा लढवली होती. पराभवानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणात खेळी करण्यात आली आहे.
न्यूज एजेंसी एएनआईशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, काहीतरी खेळी मोठ्या प्रमाणात झाली आहे. विशेष करून उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व आंध्रप्रदेशमध्ये. मोठ्या प्रमाणावर खेळी झाली आहे. मात्र आता या सर्व गोष्टींसाठी ही योग्य वेळ नाही. यासोबतच शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन केले. अमित शाह उत्तम रणनीतिकार असल्याचेही ते म्हणाले आणि त्यांचे फॅमिली फ्रेंड रवि शंकर प्रसाद यांचेही अभिनंदन केले आणि पटना आता स्मार्ट सिटी बनेल अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली.यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा भाजप पक्षात होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील विद्रोह खूप चर्चेत आला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच उत्तर प्रदेशमधील लखनऊ मतदार संघातील समाजवादी पक्षाची उमेदवार आणि शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनादेखील पराभवाचा सामना करावा लागला. पूनम यांच्या मतदारसंघातून भाजपचे नेते आणि गृहमंत्री राजनाथ सिंग निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांनी पूनम सिन्हा यांचा पराभव केला.