Lok Sabha Election Result 2024: देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूकीचा निकाल काही तासात स्पष्ट होणार आहे. सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. बॉक्सऑफिसवर कोणता सिनेमा चालला आणि कोणता फ्लॉप झाला हे ठरतं. पण आज काही सेलिब्रिटी हे लोकसभेच्याही रिंगणात आहेत. आज त्यांच्या सिनेमाचा नाही तर राजकीय निकाल लागणार आहे. मथुरेतून हेमा मालिनी, हिमाचल प्रदेशच्या मंडीतून कंगना राणौत, गोरखपूरमधून रवी किशन, मेरठमधून अरुण गोविल, आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा हे उमेदवार आहेत. कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर जाणून घ्या
बॉलिवूड क्वीन कंगना राणौतने (Kangana Ranaut) पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी या येथून ती भाजपाच्या तिकीटावर उभी होती. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कंगनाच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत कंगना सध्या आघाडीवर आहे. जवळपास 16100 मतांनी तिने आघाडी घेतली
दुसरीकडे मथुरेतून हेमा मालिनी (Hema Malini) यांनी यंदाही निवडणूक लढवली. गेल्या दोन टर्मपासून त्या इथल्या भाजपाच्या खासदार आहेत. आता ही त्यांची तिसरी टर्म आहे. सध्या मतमोजणीत हेमा मालिनी आघाडीवर आहेत. तब्बल 38 हजारपेक्षा अधिक मतांनी त्या आघाडीवर आहेत.
टीव्हीवर श्रीरामाच्या भूमिकेत दिसलेले अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) यांनी भाजपाकडून मेरठ मधून निवडणूक लढवली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये ते सध्या पिछाडीवर आहेत. तर समाजवादीच्या सुनीता वर्मा आघाडीवर आहेत.
सर्वांना खामोश करणारे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून उभे होते. त्यांच्या विरोधात भाजपाचे सुरिंदरसिंह आहलुवालिया आहेत. सध्या शत्रुघ्न सिन्हा काही मतांनी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.
तिकडे उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथून भोजपुरी स्टार रवी किशन (Ravi Kishan) सध्या आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात समाजवादी पार्टीच्या काजल निषाद आहेत. इथे कोण बाजी मारतं हे लवकरच स्पष्ट होईल.