यंदाची लोकसभा निवडणूक अनेकार्थाने खास होती. यंदा अनेक सुपरहिट स्टार्सनी राजकारणात पदार्पण करत, निवडणूक लढवली. मोदी लाटेवर स्वार झालेल्या यापैकी अनेक स्टार्सचा ‘पॉलिटिकल डेब्यू’ हिट झाला. पण अनेक स्टार्सचा राजकीय प्रवेश मात्र पुरता फसला. यात भोजपुरी सुपरस्टार निरहुआ,अभिनेत्रीउर्मिलामातोंडकर यांचा समावेश आहे. आझमगडमध्ये अखिलेश यादव यांना टक्कर देण्यासाठी निवडणूक मैदानात उतरलेल्या निरहुआला दारूण पराभवाचे तोंड पाहावे लागले. केवळ निरहुआच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना यावेळी पराभव पत्करावा लागला. त्यावर एक नजर
जयाप्रदा
रामपूर येथून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाºया अभिनेत्री जया प्रदा यांनाही पराभव पत्करावा लागला. समाजवादी पक्षाचे उमेदवार आजम खान यांनी त्यांचा १ लाखांवर मतांनी पराभव केला.
दिनेश लाल यादव निरहुआ
भोजपुरी सुपरस्टार दिनेशलाल यादव निरहुआ उत्तर प्रदेशातील आझमगड येथून पहिल्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरला होता. समाजवादीचे दिग्गज नेते अखिलेश यादव यांच्याविरोधात निरहुआने मांड ठोकली होती. पण बाजी पलटली आणि निरहुआ अडीच लाखांवर मतांनी पडला.
राज बब्बर
फतेहपूर सिक्री येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणारे अभिनेते राज बब्बर यांना ४ लाखांवर मतांनी पराभव पत्करावा लागला. यावेळी राज बब्बर यांच्यासाठी त्यांचा मुलगा व अभिनेता प्रतिक बब्बरने जमून प्रचार केला होता. पण इतके करूनही राज बब्बर यांचा पराभव झाला.
पूनम सिन्हा
शत्रुध्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लखनौ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत त्यांचा थेट मुकाबला होता. पण पूनम सिन्हा यांचा ३ लाखांवर मतांनी पराभव झाला.
प्रकाश राज
कर्नाटकातील बेंगळुरू मध्य लोकसभा मतसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरलेले अभिनेते प्रकाश राज यांनाही निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यांना केवळ २८ हजार ९०६ मते पडलीत. त्यांचे प्रतिस्पर्धी व भाजपा उमेदवार पीसी मोहन यांना ६ लाख मते पडलीत.
महाराष्ट्रात उत्तर मुंबईची जागा लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिलाही पराभव पत्करावा लागला. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणारी उर्मिला साडे चार लाख मतांनी हरली. भाजपा उमेदवार गोपाल शेट्टी यांच्याकडून तिला पराभव पत्करावा लागला.
मुनमून सेन
पश्चिम बंगालच्या आसनसोल येथून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक मैदानात उतरलेल्या अभिनेत्री मूनमून सेन यांचा १ लाखांवर मतांनी पराभव झाला.