सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यावेळी वरळीतील एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेता वरुण धवन (Varun dhawan) याला सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे हा पुरस्कार स्वीकारत असताना वरुणने 'जय भवानी, जय शिवाजी' असा जयघोष करत पुरस्कार स्वीकारला.
अभिनेता वरुण धवन याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्याने उपस्थित असलेल्या सगळ्यांचे आभार मानले. इतकंच नाही तर त्याने महाराष्ट्राप्रती असलेलं त्याचं प्रेमही व्यक्त केलं. "नमस्कार,आज मला एवढा मोठा सन्मान मिळतोय त्यासाठी मी लोकमतचा खूप आभारी आहे. महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. आणि खरं सांगायचं तर माझ्या वडिलांचं जे यश आहे ते या महाराष्ट्रामुळेच आहे. तसंच माझं सगळं आयुष्य, माझं शालेय शिक्षण सारं काही महाराष्ट्रात झालंय. माझ्या या लहानशा करिअरमध्ये मला मिळालेला हा खूप मोठा पुरस्कार आहे", असं वरुण म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "आजकाल खूप पुरस्कार सोहळे होतात, त्यात आम्ही जातो सुद्धा मात्र, हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे. आणि हा पुरस्कार स्वीकारतांना मला फार अभिमान वाटतोय. जय भवानी, जय शिवाजी.. जय महाराष्ट्र, जय हिंद."
दरम्यान, वरुणने जय भवानीचा जयघोष केल्यानंतर उपस्थित साऱ्यांनीच कडाडून टाळ्या वाजवल्या. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार सोहळा दरवर्षी रंगत असतो. लोकसेवा/समाजसेवा, आयएएस, आयपीएस, राजकारण, शिक्षण, क्रीडा, कृषी, उद्योग/व्यवसाय, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने जगभरात महाराष्ट्राचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या गुणवंतांना हा पुरस्कार देण्यात येतो.