राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि इतर पोलिसांना दरमहा १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिले होते, असे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले. या 'लेटरबॉम्ब'मुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिले होते. या पत्रामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे.
महाराष्ट्रात नव्हे तर केंद्रात देखील या गोष्टीची चर्चा रंगली आहे. हे सगळे सुरू असताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातील आहे. या व्हिडिओत आपल्याला आयपीएस अधिकारी संजय पांडे दिसत असून लाच कशाप्रकारे घेतली जाते आणि त्याचे वाटप कशाप्रकारे केले जाते याविषयी ते बोलताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये आमिर खान बोलत आहे की, “पोलिस अधिकारी, कॉन्स्टेबल हे सामान्य माणूस, ऑटोरिक्षा चालक, फेरीवाले अशा अनेकांकडून लाच घेताना आपल्याला अनेकवेळा दिसतात. पोलिसांचा पगार हा अतिशय कमी असल्याचे आपण नेहमीच बोलत असतो. पण ते लाच घेतात याचा अर्थ त्यांची कमाई ही चांगली असते.”
यावर आयपीएस अधिकारी संजय पांडे उत्तर देतात की, “जर हे लोकांकडून वसूल केलेले पैसे कुणा एका व्यक्तीकडे राहिले असते, तर मी या गोष्टी वर सहमत असतो. पण हे पैसे तो एकच व्यक्ती घरी घेऊन जातो असे मला तरी वाटत नाही.”
त्यानंतर आमिर त्यांना विचारतो की, वसूल केलेल्या पैशांचे काय होते, ते कुठे जातात? त्यावर आयपीएस पांडे सांगतात, “आपण सर्व लोकशाहीमध्ये राहात आहोत. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की वरिष्ठांची क्रमवारी असते. मग त्यावर आपले राजकारणी येतात. ही एक साखळी आहे आणि या साखळीत …”
त्यावर याचे वाटप केले जाते का असे आमिर विचारतो. त्यावर भष्टाचाराचे संघटित आणि अंसघटित असे दोन प्रकार असतात असे ते अधिकारी या व्हिडिमध्ये सांगत आहेत. ते सांगतात, सामान्य लोकांनी काही नियम तोडले तर त्यांच्याकडून काही पैसे घेतले जातात. पोलिसांना हे माहित नाही की ते किती लोकांना पकडतील, त्यांच्याकडून किती रक्कम मिळेल, या गोष्टी बदलत असतात. त्या असंघटित असतात. पण हॉटेल, रेस्टॉरंट, दारूची दुकाने, बार यांच्याकडून जे पैसे गोळा केले जातात. विशेषतः महाराष्ट्रात मिनी डान्स बार आहेत. त्यांच्यावर बंदी आहे पण अजूनही काही ठिकाणी ती सुरू आहेत. ही झाली संघटित सेटलमेंट, संस्थात्मक वसूली...याविषयी सगळ्यांना कल्पना असते.
त्यावर आमिर विचारतो की, काही रक्कम ही अपेक्षित असते का त्यावर पांडे हो असते असे उत्तर देताना दिसत आहेत.