कलाकार: बॉबी देओल, विक्रांत मॅसी, सान्या मल्होत्रा
दिग्दर्शक: शंकर रमन
रेटिंग: 2.5
केवळ डिजिटलवर प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह हॉस्टेल’मध्ये (Love Hostel) आपल्या देशातील विविध ठिकाणी तरुण जोडप्यांना होणाऱ्या त्रासाचे चित्रण करतो. अजूनही प्रेमविवाहाला जे लोक पाप मानतात आणि ‘भारतीय संस्कृती’विरुद्धची संकल्पना मानतात, त्यातून रक्तपात आणि गुंडांचा त्रास यांचं चित्रण करण्याचा प्रयत्न यात केला आहे. शंकर रमन दिग्दर्शित या चित्रपटात विक्रांत मॅसी, सान्या मल्होत्रा आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत आहेत. पटकथा थोडीशी ताणलेली असली तरी या चित्रपटाचा प्रभाव पडतो.
समाज, राजकारण आणि सत्तेत असलेले लोक कसे शोषण करतात आणि त्यांच्या कुटुंबाला समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी थंड रक्ताच्या हिंसाचाराला कसे प्रोत्साहन देतात, याचे हरियाणाच्या ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीवरील चित्रण या सिनेमात आहे. आपल्या देशात राजकारण आणि सत्ताकेंद्रे अधिकाऱ्यांवर कसा प्रभाव टाकतात तसेच कुटुंब किंवा व्यक्ती धर्माच्या आधारावर परिस्थिती सहजपणे कशी हाताळतात, हेदेखील यात दाखवले आहे. सर्व पात्रांचा हरयाणवी उच्चार आणि संवाद स्पष्टपणे स्थानिक प्रभाव जाणवतो. अपशब्दांनी भरलेले संवाद कोणत्या ना कोणत्या प्रकारे दृश्याची प्रभावी मांडणी करतात. काही दृश्ये निश्चितपणे पंच लाईनवर चुकत असली तरी त्यामुळे चित्रपटाची लय बिघडत नाही.
या चित्रपटात अभिनेता विक्रांत मॅसीने, अहमद-आशू शोकीनची भूमिका साकारली आहे. नेहमीप्रमाणेच त्याचा अभिनय प्रभावित करतो. विक्रांतच्या ऑन-स्क्रीन परफॉर्मन्समुळे तो नेहमीपेक्षा वेगळा जाणवतो. सान्या मल्होत्राने हे पात्र नक्कीच निभावून नेले आहे. मीनाक्षी सुंदरेश्वरपासून तिच्यात एक प्रभावी बदल दिसतो. धीट, बडबडी आणि उत्स्फूर्त ज्योती दिलावरची भूमिका सान्याने सहजपणे साकारली आहे.
या चित्रपटातील डागर हे आणखी एक महत्त्वाचे पात्र बॉबी देओलने केले आहे. थंड डोक्याने खून करणाऱ्या एका कॉन्ट्रॅक्ट किलरची त्याची सामान्य गुंडाची व्यक्तिरेखा त्याने जीव ओतून केली आहे. कोणीतरी एकजण अंध, संकुचित आणि समाजातील इतर कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात कसा असू शकतो, हे देखील हे पात्र दाखवते. राज अरुणसह सहायक कलाकारांनी ठिकठाक कामं केली आहेत. छोट्या पडद्यावर किती प्रभावी ठरेल, हे माहिती नाही; पण मोठ्या पडद्यावर ‘लव्ह हॉस्टेल’ हा एक चांगला अनुभव ठरू शकतो.
चित्रपट परीक्षण - संदीप आडनाईक