Join us

एका प्रवासात पडले होते राज कुमार एअर होस्टेसच्या प्रेमात, जाणून घ्या या प्रेमकथेचे पुढे काय झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 3:52 PM

एका विमान प्रवासाच्या दरम्यान राज कुमार एका एअर होस्टेसच्या प्रेमात पडले होते. ही एअर होस्टेस एंग्लो इंडियन मुलगी असून तिचे नाव जेनिफर होते.

राज कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत वक्त, दिल एक मंदिर, पाकिजा, सौदागर यांसारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या. बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. राजकुमार यांच्या अभिनयाचे अनेक चाहते होते. त्याच्या संवादफेकीवर तर प्रेक्षक फिदा होते असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. आजही इतक्या वर्षांनंतर देखील त्यांचे अनेक संवाद प्रेक्षकांच्या मनात ताजे आहेत. राज कुमार यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1926 ला पाकिस्तानमधील बलुचिस्तानामध्ये झाला. त्यांचे खरे नाव हे कुलभुषण पंडित असून ते काश्मिरी पंडित होते. फाळणीनंतर ते भारतात आले. त्यांची शरीरयष्ठी खूप चांगली असल्याने त्यांना पोलिस दलात सब इन्स्पेक्टर या पदावर नोकरी मिळाली. माहिम पोलिस स्टेशनमध्ये ते काम करत असताना अचानक त्यांची भेट निर्माते बलदेव यांच्यासोबत झाली. बलदेव त्यांच्या एका कामासाठी माहिम पोलिस स्टेशनमध्ये आले होते. राज कुमार यांच्या बोलण्याची ढब त्यांना प्रचंड आवडली. त्यामुळे त्यांनी लगेचच शाही बाजार या त्यांच्या चित्रपटासाठी त्यांना ऑफर दिली. राज कुमार यांनी नोकरीचा राजीनामा देत चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांच्या पहिल्याच चित्रपटापासून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. राज कुमार यांचा मृत्यू 3 जुलै 1996 ला झाला. त्यावेळी त्यांचे वय केवळ 69 वर्षं होते. त्यांचे अंतिम संस्कार अतिशय साधेपणाने केले जावेत अशी त्यांची इच्छा असल्याने त्यांच्या निधनाविषयी मीडियाला खूपच उशिरा त्यांच्या कुटुंबियांकडून कळवण्यात आले होते. राज कुमार यांचे लग्न जेनिफर यांच्यासोबत झाले होते. त्यांची प्रेमकथा खूपच रंजक होती. एका विमान प्रवासाच्या दरम्यान ते एका एअर होस्टेसच्या प्रेमात पडले होते. ही एअर होस्टेस एंग्लो इंडियन मुलगी असून तिचे नाव जेनिफर होते. जेनिफर आणि राज कुमार यांनी काही भेटींनंतर लग्न केले. जेनिफर यांचे नाव त्यांनी लग्नानंतर गायत्री असे ठेवले. त्या दोघांना पुरू, पाणिनी आणि वास्तविकता अशी तीन मुले आहेत.