Join us

-अन् लकी अलीच्या ‘त्या’ ट्विटने वाढवले इंडस्ट्रीचे टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 7:49 PM

कॉमेडीचा बादशाह मेहमूद याचा मुलगा लकी अली अनेक संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत आहे. आपल्या आवाजाने लाखोंची मने जिंकणाऱ्या याच लकी अलीने आज एक ट्विट करून खळबळ उडवून दिली. 

कॉमेडीचा बादशाह मेहमूद याचा मुलगा लकी अली अनेक संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत आहे. आपल्या आवाजाने लाखोंची मने जिंकणाऱ्या याच लकी अलीने आज एक ट्विट करून खळबळ उडवून दिली. त्याचे ते ट्विट वाचून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. बॉलिवूड इंडस्ट्रीही टेन्शनमध्ये आली. होय, कारण लकी अलीचे ते ट्विट होते कॅन्सरबद्दलचे. इरफान खान आणि सोनाली बेंद्रे जीवघेण्या कॅन्सरशी झुंज देत असताना लकी अलीने अचानक कॅन्सरबद्दल ट्विट करावे, याने अनेकांना धक्का बसला.

 ‘डियर किमोथेरपी, तू कधीच शेवटचा पर्याय असू शकत नाही,’ असे ट्विट लकीने केले. त्याच्या या ट्विटने अनेक प्रश्न निर्माण केले. लोकांनी लकीचे हे ट्विट वाचले अन् लकी अलीलाही कॅन्सरने ग्रासले तर नाही ना, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. अखेर त्याच्या या ट्विटचा खातरजमा केली गेली आणि खरे काय ते समोर आले. लकी अली अशा कुठल्याही आजाराने पीडित नाही, असे त्याच्या जवळच्या सूत्रांनी स्पष्ट केले. लकी पूर्णपणे स्वस्थ आहे.  त्याने  केवळ कॅन्सरबद्दलची चिंता आपल्या ट्विटमधून व्यक्त केली, असेही सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या या खुलाशानंतर कुठे सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.लकी अली सध्या ग्लॅमरपासून दूर शेतीत आपला अधिकाधिक वेळ घालवतांना दिसतोय. अर्थात काही लाईव्ह कॉन्सर्टही तो करतोय. लकी एक गायक आहे. तसाच एक चांगला अभिनेताही आहे. ‘कांटे’ या चित्रपटात त्याचा अभिनय आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. पण त्यानंतर लकी इंडस्ट्रीतून गायब झाला.

हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांनी लकी अलीला एक नवी ओळख दिली होती. ‘ए पल का जीना’ आणि ‘क्यो होता है प्यार’ ही दोन गाणी लकीने गायली होती. पण यानंतर लकी गायकीच्या क्षेत्रातही फार चमकला नाही.   यशाच्या बाबतीत लकी भलेही अपयशी ठरला असेल पण लग्नाच्या बाबतीत म्हणाल तर त्याची तीन लग्ने झालीत. मेघन जेन मकक्लियरी हिच्यासोबत लकीने पहिले लग्न केले. तिने लकीच्या ‘सुनो’ या अल्बममध्ये काम केले होते. मेघन व लकीला दोन मुले झालीत. पण नंतर या दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर लकीने इनायासोबत लग्न केले. इनायापासूनही लकीला दोन मुले झालीत. पण तिच्यापासूनही लकी विभक्त झाला. यानंतर लकीच्या आयुष्यात आयशा आली.

टॅग्स :लकी अली