गीतकार-पटकथाकार जावेद अख्तर यांचे असंख्य चाहते आहेत. गेली अनेक वर्ष जावेद अख्तर हे बॉलिवूडमध्ये त्यांच्या लेखणीमुळे राज्य करत आहेत. कधी उत्कृष्ट सिनेमे लिहून तर कधी सुंदर शब्दांनी युक्त असलेली गाणी लिहून जावेद अख्तर रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. जावेद कायमच त्यांच्या बेधडक वक्तव्यांनी चर्चेत असतात. नुकतंच एका मुलाखतीत जावेद यांनी लग्नसंस्थेवर त्यांचं मत व्यक्त केलंय.
लग्नसंस्थेवर जावेद अख्तर काय म्हणाले?
बरखा दत्त यांच्या मोजो स्टोरी शोमध्ये जावेद अख्तर म्हणाले की, "लग्न-विवाह वगैरे एक बेकार गोष्ट आहे. ही एक खूप जुनी परंपरा आहे. हा एक असा दगड आहे जो गेली अनेक वर्ष डोंगरावरुन खाली ढकलला जातो. या प्रक्रियेत खूप कचरा, घाण आणि बेकार गोष्टी सोबत येतात. पती-पत्नीमध्ये एकमेकांविषयी सन्मान आणि समजुतदारपणा आहे का? हा प्रश्न आहे. माणूस हा कोणत्याही जेंडरचा असला तरी आनंदी राहण्यासाठी एकमेकांची इज्जत, विचार जुळणं आणि एकमेकांना स्पेस देणं गरजेचं आहे."
जावेद अख्तर पुढे म्हणतात, "एकमेकांना समजणं आणि मित्रांसारखं राहणं हा लग्नाचा खरा अर्थ आहे. नात्यांमध्ये त्या दोघांनाही स्वप्न आणि इच्छांना पूर्ण करण्याचा हक्क आहे. प्रेमामध्येही सन्मान असणं खूप गरजेचं आहे. एक स्वतंत्र महिला असेल तर तिच्यासोबत राहाणं सोप्पी गोष्ट नाहीये. माझं आणि शबानाचं लग्न होणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. लग्नाचा पाया हा मैत्री आहे."