सत्तरच्या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट शोलेतील सांभाच्या भूमिकेतून अभिनेते मॅक मोहन यांनी रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली होती. या भूमिकेनंतर ते सांभाच्या नावाने प्रचलित झाले होते. मॅक यांनी सिनेमात कधीच मुख्य भूमिका साकारली नाही पण ते बॉलिवूडमधील बऱ्याच सिनेमात छोट्या मोठ्या भूमिकांमध्ये झळकले. मॅक मोहन रवीना टंडनचे मामा लागतात.
मॅक मोहन यांनी बॉलिवूडमधील प्रत्येक मोठ्या स्टारसोबत स्क्रीन शेअर केली आहे. जवळपास तीन तासाच्या शोले सिनेमात सांभाने फक्त एकच डायलॉग बोलला होता आणि हा डायलॉग होता पूरे पचास हजार. या एका डायलॉगने ते जगभरात लोकप्रिय झाले होते. तसेच गब्बर सांभाला अरे ओ सांभा कितने आदमी थे असे विचारतो हा संवाद तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता.
शोले या चित्रपटानंतर मॅक यांना सांभा या नावानेच ओळखले जाऊ लागले. पण या चित्रपटाच्या यशानंतर त्यांचे वडील त्यांच्यावर प्रचंड संतापले होते. मॅक मोहन यांचे वडील आर्मीत होते. ते प्रचंड शिस्तप्रिय होते. या चित्रपटानंतर मॅक यांना भेटणारे सगळेच त्यांना सांंभा या नावाने हाक मारत असत, ही गोष्ट त्यांच्या वडिलांना अजिबात आवडत नसे. तुझे नाव मॅक आहे, सांभा नाही असे त्यांना सांग... असे त्यांच्या वडिलांचे म्हणणे असे. त्यामुळे शोलेच्या यशानंतर मॅक मोहन यांच्यावर त्यांचे वडील प्रचंड चिडत असत.