सिनेइंडस्ट्रीचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुबाला (madhubala). आपल्या आरस्पानी सौंदर्याच्या जोरावर मधुबालाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. वयाच्या ९व्या वर्षी सिनेकारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मधुबालाने अनेक सुपरहिट सिनेमा दिले. मात्र, वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. मात्र, तिने इंडस्ट्रीमध्ये जितके वर्ष काम केलं त्या वर्षांमध्ये तिने अनेक गाजलेले सिनेमा केले. विशेष म्हणजे मधुबालाचा हाच जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे.
नुकतीच मधुबालाच्या बायोपिकची घोषणा झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आता या सिनेमाची चर्चा रंगू लागली आहे. मधुबाला यांचे सिनेमा जितके गाजले तितकंच त्यांचं पर्सनल आयुष्यही चर्चेत राहिलं होतं. त्यावेळी दिलीप कुमार यांच्यासोबत असलेल्या मधुबालाच्या नात्याची खूप चर्चा झाली. इतकंच नाही तर प्रसिद्ध संगीतकार किशोर कुमार यांच्यासोबतचं त्यांचं वैवाहिक जीवनही चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यामुळे त्यांचा हाच सगळा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर उतरणार आहे.
जसमीत के., सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन ‘मधुबाला’ या बायोपिकची निर्मिती करणार आहे. मधुबालाची बहीण मधुर ब्रिज भूषण आणि अरविंद कुमार मालवीय (मधुबाला व्हेंचर्स) या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. विशेष म्हणजे या सिनेमाची घोषणा झाल्यापासून मधुबालाच्या भूमिकेत कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
ही अभिनेत्री साकारणार मधुबालाची भूमिका
सध्या तरी या सिनेमात कोणती अभिनेत्री झळकणार हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, क्रिती सेनॉनच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. मधुबालाने तिच्या २९ वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास ७६ सिनेमांमध्ये काम केलं. इतकंच नाही तर त्या काळात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जातात.
मधुबालाचे गाजलेले सिनेमा
‘मुगल-ए-आझम’, ‘मिस्टर अँड मिसेस 55’, ‘चलती का नाम गाडी’, ‘बरसात की रात’ ‘बसंत’, 'नील कमल', 'दिल की रानी', 'दौलत', 'इम्तिहान', 'दुलारी', 'सिंगार', 'निशाना', 'मुगल-ए-आझम' या चित्रपटांमध्ये काम केले.