Join us

Madhubala Birth Anniversary: ‘व्हॅलेन्टाईन डे’ला जन्मलेल्या मधुबालाची ‘ती’ अधुरी एक कहाणी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 11:25 AM

Madhubala Birth Anniversary: मधुबालाचं आयुष्य एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हतं. तिच्या खासगी आयुष्याची बरीच चर्चा झाली. पण एक प्रेमकहाणी जगावेगळी...

Madhubala Birth Anniversary:  आपल्या मनमोहक हास्याने करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करणारी सौंदर्यवती म्हणजे मधुबाला (Madhubala ). ती म्हणजे बॉलिवूडला पडलेलं हे सुरेख स्वप्न. त्याकाळात तिच्या सौंदर्यावर अख्ख जग फिदा होतं. आजही तिच्या सौंदर्याच्या चर्चा होतात. आज ती आपल्यात नाही. पण आज तिचा वाढदिवस.मधुबालाचं आयुष्य एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हतं. तिच्या खासगी आयुष्याची बरीच चर्चा झाली. पण मधुबाला आणि दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची प्रेमकहाणी म्हणजे जगावेगळी. आजही चाहते ती विसरू शकलेले नाहीत. मधुबाला दिलीप कुमार यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करायची. पण असं काही घडलं की, ही प्रेमकहाणी कायमची अधुरी राहिली. (Madhubala And Dilip Kumar Love Story)

होय, 1951 साली ‘तराना’च्या सेटवर मधुबाला व दिलीप कुमार  यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. दोघंही पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले होते.   दिलीप कुमार यांना गुलाबाचं फुल आणि सोबत प्रेमभावनांनी चिंब भिजलेलं प्रेमपत्र पाठवत मधुबालाने आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. दोघांची प्रेमकहाणी बहरत असताना मधुबालाचे वडिल अयातुल्ला खान यांना  भणक लागली आणि त्यांनी या नात्याला कडाडून विरोध केला. असं म्हणतात की, मधुबाला आणि दिलीपकुमार यांचं लग्न झालं तर आपला आर्थिक स्रोत संपेल, या भीतीने  मधुबालाच्या वडिलांनी या नात्याला विरोध केला होता.  अशाही स्थितीत या मधुबाला व दिलीप कुमार यांचे प्रेम कित्येक वर्ष टवटवीत राहिलं.  पण ‘नया दौर’ या सिनेमाचे निमित्त झालं आणि ही प्रेमकहाणी कोर्टापर्यंत पोहोचली.

बी. आर. चोप्रा यांच्या ‘नया दौर’ मध्ये मधुबाला व दिलीप कुमार लीड रोलमध्ये होते.  भोपाळमध्ये 40 दिवस शूटिंग होणार होतं. पण मधुबालाला आऊट डोअर शूटींगसाठी पाठवण्यास तिचे वडील मानेनात.  मधुबालाही  वडिलांच्या इच्छेबाहेर नव्हत्या. अखेर नाईलाजास्तव  बी. आर. चोप्रा यांनी मधुबालाऐवजी वैजयंतीमालाला चित्रपटासाठी साईन केले. मधुबालाला काढून वैजयंतीमालाला साईन करण्याचं हे प्रकरण इतकं विकोपाला गेलं की, अखेर कोर्टात पोहोचलं. या वादासोबत अप्रत्यक्षपणे  मधुबाला व दिलीप कुमार यांचं प्रेमप्रकरणही न्यायालयात गेलं.. न्यायालयात दिलीप कुमार यांनी दिग्दर्शकाची बाजू घेत, मधुबालांविरोधात साक्ष दिली आणि इथेच सगळं संपलं. दिलीप कुमार यांच्या या साक्षीने मधुबाला प्रचंड दुखावल्या गेल्या.

मतभेद इतके वाढले की, मधुबाला व दिलीप कुमार यांच्यात कधीही न मिटणारं अंतर निर्माण झालं. खरं तर यावेळी आधीपासूनच सुरु असलेलं ‘मुगल -ए-आजम’चं शूटींग सुरु होतं. पण सेटवर सोबत असूनही मधुबाला व दिलीप कुमार अनोळखी झाले होते. एक लव्हस्टोरी कायमची संपली होती... 

टॅग्स :मधुबालादिलीप कुमारव्हॅलेंटाईन्स डेबॉलिवूड