सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आहे. कधी क्रीडा जगतातील लोकांवर तर कधी बॉलिवूडच्याच सेलिब्रिटींवर बायोपिक बनत आहेत. आता या यादीत एका महान अभिनेत्रीच्या नावाचा समावेश होणार आहे. होय, आपल्या अभिजात सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मधुबाला हिच्या आयुष्यावर बायोपिक येत आहे. आजही सौंदर्य म्हटले की, मधुबाला हिचेच नाव आठवते. उण्यापुऱ्या दहा वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये मधुबालाने रसिकांना वेड लावले. अभिनय सम्राट दिलीप कुमारपासून तर किशोरकुमारपर्यंत सगळेच तिच्यावर फिदा होते. तिच्या आरस्पानी सौंदर्याने, तिच्या मधूर हास्याने सिनेरसिकांना जणू वेड लावले. अवघ्या ३६ व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणा-या याच अभिनेत्रीचे विविध चढउतारांनी भरलेले आयुष्य चंदेरी पडद्यावर आणण्याची तयारी सुरू झाली आहे. अद्याप या बायोपिकची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण मधुबालाची लहान बहीण मधूर ब्रिज भूषण हिने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.माझ्या बहिणीच्या आयुष्यावर चित्रपट येतोय़ माझा एक अतिशय जवळचा मित्र हा चित्रपट प्रोड्यूस करतोय़ योग्यवेळी या चित्रपटाची घोषणा केली जाईल़ स्टारकास्टबद्दलही लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल्र, असे मधूरने सांगितले़ नक्कीच मधूर हा चित्रपट दिग्दर्शित करणार नाही़ ही जबाबदारी इंडस्ट्रीतल बड्या दिग्दर्शकाच्या खांद्यावर सोपवली जावू शकते, असे कळतेय़सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गत पाच वर्षांत मधुबालाच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची इच्छा असलेल्या अनेकांनी मधूरशी संपर्क साधत यासंदर्भातील हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला. पण मधूरला योग्य वेळेची प्रतीक्षा होती. आपल्या बहिणीच्या आयुष्याला पडद्यावर साकारताना योग्य न्याय मिळावा, अशीही तिची इच्छा होती.करिना कपूरच्या नावाची चर्चा
मधुबालाच्या आयुष्यावर बायोपिक येणार, हे स्पष्ट होताच, ही व्यक्तिरेखा कोण साकारणार, यासाठीच्या नावांचीही चर्चा सुरु झाली आहे. या शर्यतीत अभिनेत्री करिना कपूरचे नाव आघाडीवर आहे. खुद्द मधूरनेही करिनाच्या नावाला पसंती दिली आहे. आधी मधुबालाची भूमिका माधुरी दीक्षितने करावी, अशी माझी इच्छा होती. पण आता मला करिनाने ही भूमिका करावी, असे वाटतेय. कारण करिनाही मधुबालासारखीच खट्याळ आहे. ती सुंदरही आहे, असे मधूर म्हणाली. मधूर म्हणते, त्याप्रमाणे करिनाने ही भूमिका स्वीकारल्यास एक दमदार चित्रपट तिच्या नावावर जमा होईल.